रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संकटाचं नाव झॉम्बी असो वा करोना.. ते येतं तेव्हा कुठल्याही शहरातली, गावातली आर्थिक-सामाजिक सगळी अंतरं गिळून टाकतं आणि फक्त माणसाला हतबल करतं. शहरात राहिलं तर जगणं अवघड आणि शहराबाहेर जायचं तर तथाकथित निरोगी माणसं वेस अडवून उभी.. अशा परिस्थितीत माणुसकीच्या भावनेतून केलेले एकत्रित प्रयत्नच जगवतात, हा करोनाने दिलेला ताजा अनुभव. याच अनुभवाशी साधर्म्य सांगणारी झॉम्बी आणि डोंबिवलीकरांची काल्पनिक गोष्ट आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ चित्रपटात पाहायला मिळते.

डोंबिवलीसारख्या शहरातील पांढरपेशी मध्यमवर्गीयांना पिण्याच्या पाण्यापासून अनेक नागरी समस्यांशी झगडतच जगावं लागतं. रोजच्या या झगडय़ाची सवय असलेल्या डोंबिवलीकरांना अचानक शहरात आलेले झॉम्बी नामक अनाकलनीय गूढ चटकन उकलणं कठीणच.. भूतप्रेत-पिशाच्च, हडळ, मुंजा अशा सगळय़ा गोष्टी लहानपणीपासून ऐकून असलेल्या एकूणच भारतीयांना विशेषत: मराठी माणसांना झॉम्बी हा अवतार फक्त परदेशी चित्रपटातून पाहिलेला माहिती आहे. झॉम्बी म्हणजे भूत नव्हे, कुठल्यातरी रसायनांमुळे वा अन्य कारणांमुळे विद्रुप झालेल्या शरीरांनी आणि दुसऱ्यावर हल्ला करायचा या एकाच विचाराने वावरणारी ही संवेदनाहीन माणसं.. ही संकल्पना साध्यासोप्या कथेतून प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवायची आणि मग त्यांना झॉम्बींच्या विश्वात गुंतवून ठेवायचं हे शिवधनुष्य इथे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या चमूने एकत्रित पेललं आहे. महेश अय्यर यांची कथाकल्पना साईनाथ गनुवाड, सिध्देश पुरकर आणि योगेश जोशी या लेखकांनी फुलवली आहे. कथेच्या पातळीवर हा झॉम्बी प्रकार सोपा करून सांगणं आणि एखाद्या शहराच्या आत्म्याशी त्याची नाळ जुळवणं हे काम लेखक मंडळींनी यशस्वी केलं आहे. पण म्हणून ही कथा फक्त डोंबिवलीपुरती मर्यादित राहते असंही नाही. ही कथा आपल्याकडच्या कुठल्याही शहरात घडू शकते, हे सहजपणे जावणतं हे या चित्रपटाचं वैशिष्टय़.

पुण्याहून नोकरीच्या निमित्ताने डोंबिवलीत आलेलं तरुण जोडपं सुधीर (अमेय वाघ) आणि सीमा (वैदेही परशुरामी) यांच्यापासून कथेची सुरुवात होते. सीमा गर्भवती आहे, तिच्या कुठल्याही इच्छा कुठल्याही वेळी पूर्ण करण्यासाठी तयार असलेल्या सुधीरची याच मोहिमेवर असताना झॉम्बीशी पहिली गाठ पडते म्हणण्यापेक्षा त्यांच्यात झटापट होते. यातून त्याला वाचवतो तो जग्गू आणि विश्वास (ललित प्रभाकर). या दोन्ही वल्ली एकाच व्यक्तीत आहेत. जग्गू हा जनता नगरमधला कार्यकर्ता रहिवासी आहे. डोंबिवलीत असलेल्या मुसळेंच्या मिनरल वॉटर फॅक्टरीमुळे जनता नगरमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही यासाठी जग्गू झगडतो आहे. दुसरीकडे सुधीरला भेटलेला झॉम्बी हा जनता नगरमध्ये अनेक झॉम्बी निर्माण करत राहतो. जनतानगर आणि सुधीर राहात असलेल्या टॉवरमधली िभत पाडून हे झॉम्बी शहरात सगळीकडे पसरतात. त्यांच्यापासून जीव वाचवताना झोपडपट्टीवाले आणि टॉवरवाले हे अंतर गळून पडतं. शहराला वाचवणारे पोलीस, डॉक्टर – वैद्यकीय अधिकारी सगळेच झॉम्बी झाले असताना आपला जीव वाचवायचा कसा?, या संकटात सापडलेल्यांना येणारे अनुभव आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची गोष्ट म्हणजे ‘झोंबिवली’.

‘झोंबिवली’ची ही गोष्ट पडद्यावरही त्यातली तांत्रिकता सांभाळून आणि फार गंभीर न करता हसतखेळत सांगण्याची कसरत दिग्दर्शक म्हणून आदित्य सरपोतदार यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. झॉम्बी कसे दिसतात, कसे वागतात याची आपल्याला परिचयाची असलेली रूपरेषा सांभाळतानाच पडद्यावर पाहताना झॉम्बी किळसवाणे वाटणार नाहीत, याचीही काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. अर्थात यात भयाची मात्रा कमी आणि विनोदाची जास्त आहे. आणि  हे समीकरण सांभाळण्याचं काम चित्रपटातील तिन्ही मुख्य कलाकार आणि काही सहकलाकारांनीही चोख निभावलं आहे. वैदेहीच्या वाटय़ाला आलेली भूमिका तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. पत्नी, प्रेमिका, सततच्या सूचना आणि साचेबध्द आयुष्याला कंटाळणारी सून आणि प्रसंगी माणुसकीच्या बाजूने उभं राहताना कोणत्याही संकटाला निडरपणे समोर जाणारी नायिका तिने खूप सहजतेने साकारली आहे. अत्यंत साधा-सरळ, हुशार, तरीही काहीसा दडपणाखाली वावरणारा, वरवर बावळट वाटणाऱ्या सुधीरची हतबलता, त्याची धडपड अशा सगळय़ा छटा अमेयने उत्तम रंगवल्या आहेत. विनोदी अभिनयावरची त्याची पकड पाहण्याची पर्वणी या चित्रपटाने दिली आहे. ललितचा जग्गू आणि विश्वास दोन्ही उत्तम आहेत. त्याच्या तोंडी असलेल्या आणि त्यानेच शोधून काढलेल्या शिव्याही कमाल आहेत. भाषा उत्तमपणे वळवून व्यक्तिरेखांमधलं सामाजिक अंतर दाखवणं शक्य आहे, त्यासाठी शिव्यांचा भडिमारच असायला हवा हे म्हणणं ललितने खोडून काढलं आहे. तृप्ती खामकर, पुष्कर लोणारकर हे छोटेखानी भूमिकेतूनही लक्ष वेधून घेतात. उत्तम कथा-दिग्दर्शन असलेला हा चित्रपट त्यातील समस्त झॉम्बी झालेल्या कलाकारांसह सगळय़ांनीच उचलून धरला आहे.

विनोदी भयपट असल्याकारणाने यातला विनोद मोठा आहे हे खरे असले तरी कथेतील काही संदर्भ अगदीच तोकडे पडतात. झॉम्बींच्या उदयासाठी पुरेपूर कारण निर्मिती लेखक -दिग्दर्शकांनी केली आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे सर्वसामान्य माणसांची झॉम्बीसारखी अवस्था होते आणि कुठल्या वापरामुळे त्यावर नियंत्रण मिळतं, याचं ठोस कारण कुठेही दिलेलं नाही. ही बाब पूर्णपणे दुर्लक्ष करण्यासारखी नाही. कलाकारांच्या उत्तम विनोदी अभिनयामुळे त्याकडे फारसे लक्ष जात नाही हे खरे असले तरी त्यामुळे चित्रपटाला काहीएक मर्यादा येते हेही लक्षात घ्यायला हवे. मात्र ‘झिम्मा’च्या यशानंतर प्रेक्षकांना सध्याचा ताण विसरायला लावून त्यांचे निखळ मनोरंजन करणारा, त्यांना पुरेपूर हसवणारा असा हा झॉम्बीपट आहे यात शंका नाही.

झोंबिवली

दिग्दर्शक – आदित्य सरपोतदार

कलाकार –अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, तृप्ती खामकर, पुष्कर लोणारेकर.