कथेचं नाटय़रूपांतर मराठी रंगभूमीला नवं नाही. पूर्वापार ते होत आलेलं आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे प्रा. देवेंद्र राज अंकुर यांना मात्र ‘कहानी का रंगमंच’ ही संकल्पना जणू आपणच प्रथम शोधून काढली असं वाटतं आणि त्याचं श्रेय ते घेत असतात. तथापि महाराष्ट्रातील भारूड, प्रवचन आदी प्राचीन लोकपरंपरेत खरं तर या संकल्पनेची मूळं सापडतात. एकांकिका, दीर्घाक, नाटक अशा सर्व प्रकारांमध्ये आजवर कथेची नाटय़रूपांतरं मराठीत सादर झालेली आहेत.. आजही ती होत असतात. विलेपार्ले येथील म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या रूढ चाकोरीबाहेर पडत कथानाटय़ाचा असाच एक सुंदर प्रयोग नुकताच सादर केला. कथाकार व. पु. काळे आणि रत्नाकर मतकरी यांच्या ‘झोपाळा’ या समान शीर्षकाच्या दोन वेगवेगळ्या कथा निवडून त्या एकाच वेळी नाटय़रूपात सादर करण्याचा त्यांचा हा ‘प्रयोग’ केवळ स्तुत्यच नाही, तर अत्यंत जाणकारीनं पेश केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच.
व. पुं.ची ‘झोपाळा’ ही कथा त्यांच्या कथेचा बव्हंशी केंद्रबिंदू असणाऱ्या चाकोरीतलं आयुष्य जगणाऱ्या मध्यमवर्गीय माणसांभोवतीच फिरणारी आहे. सामान्यांच्याही जीवनात कधीतरी क्षणिक आयुष्य उजळविणारे चुकार क्षण येऊन गेलेले असतात. त्या क्षणांच्या स्मरणरंजनात ते मग आपलं वर्तमान वास्तव सुसह्य़ करीत असतात. क्वचित कधीतरी पुन्हा एखाद्या वळणावर त्या गहिऱ्या क्षणांशी निगडित व्यक्तींची पुनर्भेट होते आणि पुनश्च त्याच्या आयुष्यातले काही क्षण डहुळतात. मात्र, आता भूतकाळातील त्या सुंदर क्षणांशी पुन्हा नव्यानं नातं जोडणं शक्य नसतं. त्यामुळे खपली धरलेल्या जखमेत एक कातर वेदना पुनश्च जागवते आणि यथाकाल हळूहळू ती कमीही होत जाते. याचीच कहाणी व. पुं.नी ‘झोपाळा’मध्ये कथन केली आहे.
एका कचेरीत स्टेनो म्हणून काम करणाऱ्या आणि साहेबाशी थेट संबंध येत असल्याने रूबाब मारणाऱ्या ललित शहाची ही गोष्ट. कार्यालयातील इतरांशी जेवढय़ास तेवढं बोलणारा ललित एके दिवशी एका उच्चभ्रू स्त्रीच्या आलिशान मोटारीतून कचेरीत येतो आणि सर्वाचंच कुतूहल जागं होतं. सरळसोट आयुष्य जगणाऱ्या ललितला ही स्त्री भेटली कुठं? तिचा-त्याचा संबंध काय? असे अनेक प्रश्न कचेरीतल्या सहकाऱ्यांना पडतात. त्यांचा मागोवा घेताना ललितची एकच नव्हे, तर दोन अद्भुत प्रेमकहाण्या उलगडत जातात. पहिली : जिथं त्याचा जन्म झाला आणि वयात येईतो जिथं त्याचं सतत जाणं-येणं होतं, त्या नवसारीत घडलेली.. त्यांच्या घरासमोरच राहणाऱ्या मृदुलाबरोबरच्या अस्फुट वयातल्या त्याच्या पहिल्या प्रेमाची! ती घरची श्रीमंत. आपल्या श्रीमंतीचा तोरा मिरवणारी. सामान्य स्थितीतल्या ललितला तिच्या लेखी काहीच स्थान नसतं. तिला ललितच्या घरातल्या झोपाळ्यावर बसून झोके घ्यायला मात्र फार आवडतात. त्यासाठीच ती त्याच्या घरी अधूनमधून येत असते.
पुढं तिच्या घरची परिस्थिती ढासळते. ललितच्या घरून शिळंपाक अन्न मागून खाण्याची व त्याचे जुने कपडे वापरण्याची वेळ तिच्यावर येते. त्यामुळे तिचा तोरा उतरतो. पण आता बदललेल्या परिस्थितीमुळे ती त्याला टाळायला लागते. त्याला मात्र तिच्याबद्दलची ओढ सतत बेचैन करत असते. तो तिच्याशी बोलू पाहतो, पण ती त्याला टाळत राहते. शेवटी परिस्थितीपुढे हात टेकून तिच्या घरचे लोक नवसारी सोडून बडोद्याला स्थलांतर करायचं ठरवतात. जायच्या आदल्या दिवशी ती त्याच्या घरी येते. या भेटीत मात्र ती त्याच्याशी बोलते. आता ती आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही, या जाणिवेनं तो अस्वस्थ होतो. तिच्याकडे ती वापरत असलेला आपला शर्ट (तिची आठवणीसाठी!) परत मागतो. तिला तो आपला अपमान वाटतो. तो आपल्याला रूबाब दाखवतोय असा (गैर)समज ती करून घेते.
त्यानंतर कित्येक वर्षे लोटतात. आणि एकदा अचानक ललितला तिचा पत्ता लागतो. ती जुहूला एका आलिशान बंगल्यात राहत असल्याचं त्याला कळतं. त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. एकेकाळी खाण्याला मोताद झालेल्या मृदुलाचं आयुष्य एकाएकी कसं काय बदललं, हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा त्याला होते. तो तिचा पत्ता शोधत तिच्या घरी जातो. तीही त्याचं प्रेमानं आगतस्वागत करते. त्याला आपलं राजेशाही घर दाखवते. तिनं प्रत्येक खोलीत झोपाळे लावलेले त्याला दिसतात..
त्यानंतर काही काळ ते एकमेकांच्या संपर्कात राहतात. परंतु जुनं नातं पुन्हा पालवत नाही. हळूहळू मंदावत त्यांच्या भेटी शेवटी कायमच्या थांबतात. ललितच्या आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या कोवळ्या प्रेमाची इतिश्री होते.
पुढे कॉलेजात गेल्यावर कॉलेजक्वीन असलेल्या जसवंतीशी ललितचा परिचय होतो. कॉलेजातल्या तिच्या मागे गोंडा घोळणाऱ्या रोमिओंना टाळून ती ललितशी मैत्री करते. पुन्हा एकदा ललित मोहरून येतो. तथापि, ती त्याला आपला एक सच्चा मित्र मानत असल्याचं आणि आपलं एका उद्योजक तरुणाशी लग्न ठरल्याचं सांगते आणि त्याच्या स्वप्नांची पुन्हा एकदा राख होते. अशा तऱ्हेनं आयुष्याचे टक्केटोणपे खात ललित यथावकाश लग्न करतो. संसाराला लागतो.
आणि अचानक एके दिवशी जसवंती त्याच्या ऑफिसमध्ये येते. तिच्या सौंदर्याची आभा उतरलेली असते. साध्या पेहेरावातल्या कृश जसवंतीला बघून ललितला धक्का बसतो. ती त्याला आपली परिस्थिती कथन करते. तिच्या नवऱ्याचा उद्योग रसातळाला गेलेला असतो आणि घर चालवण्यासाठी तिला एखादी नोकरी हवी असते. ललित कुठंतरी शब्द टाकून आपल्याला नोकरी मिळवून देईल अशी तिला आशा असते. ललित तिला नोकरी मिळवण्यासाठी मदतीचं आश्वासन देतो..
व. पुं.ची ही कथा योगायोगाचे अविश्वसनीय धक्के देणारी असली तरीही मानवी जीवनातील गुंतागुंतीचं दर्शन घडवणारी आहे. तिचं नाटय़रूप अत्यंत प्रभावीरीत्या सादर झालं आहे. सूत्रधाराकरवी कथा पुढे नेत असताना त्यातले नाटय़पूर्ण क्षण, पात्रांची भावनिक आंदोलनं आणि अव्यक्त शब्दांतले गहिरे अन्वयार्थ या सादरीकरणात समूर्त होतात. निवेदन आणि प्रत्यक्ष घटनांची एवढी सुंदर गुंफण यात घातलेली आहे, की कथेचा ओघ कुठंच खंडित होत नाही, वा त्यापायी रसभंगही होत नाही. निरनिराळ्या वयातील ललितसाठी वेगवेगळ्या नटांची योजना व्यक्तिरेखेचा प्रवास सुकर करते. स्टेनो (विभव राजाध्यक्ष), कॉलेजकुमार ललित (कुणाल शुक्ल) आणि शालेय वयातील ललित (यशोमान आपटे) ही तिन्ही पात्रं त्या- त्या कलाकाराने उत्तमरीत्या साकारली आहेत. किशोरवयातील नवथर प्रेमाचे अलवार विभ्रम भाग्यश्री शंकपाल (मृदुला) हिने मुद्राभिनयातून सुंदर साकारले आहेत. मॉड कॉलेजक्वीन तसंच श्रीमंतीचं तेज हरपलेली जसवंती ही दोन्ही स्थित्यंतरं मधुरा दिवेकरने सहजगत्या दाखविली आहेत. सूत्रधाराच्या भूमिकेत प्रथमेश परब थोडासा ‘लाऊड’ वाटतो. भावेश सुर्तेचा प्युनही हशे वसूल करण्याच्या नादात किंचित अति करतो. प्राजक्ता म्हसकरने ललितची आई मऱ्हाठी ढंगात वठवली आहे. ती जरी मराठीत बोलली तरी तिच्या वागण्या-वावरण्यातून तिचं गुजरातीपण ठसवलं गेलं असतं तर बरं झालं असतं.
रत्नाकर मतकरींची ‘झोपाळा’ ही कथा धुळ्यातल्या एका अल्पशिक्षित तरुणीच्या अतृप्त स्वप्नाभोवती फिरते. वय उलटून गेलं तरी लग्न न जमणाऱ्या कुसुमचं भाग्य एकाएकी पालटतं आणि नाशकातला प्रोफेसर असलेला एक तरुण तिला पसंत करतो. लग्न ठरतं. पण लग्नाला तीन दिवस असताना मुलाची मावशी वारते आणि लग्न पुढं ढकललं जातं. कुसुम आता मोठय़ा मुश्किलीनं जमलेलं हे लग्नही मोडतं की काय, या भीतीनं अर्धमेली होते. परंतु प्रोफेसर हा अपशकुन न मानता पुन्हा लग्नाची तारीख पक्की करतात. पण यावेळी त्यांना स्वत:लाच अपघात होतो आणि ते जायबंदी होतात. आता मात्र ही मुलगी अपशकुनी असल्याची त्यांची खात्री पटते आणि ते लग्न मोडतात. नाशकातल्या प्रोफेसरांच्या प्रशस्त वाडय़ात मेंदीच्या पावलांनी प्रवेश करण्याचं स्वप्न कुसुमनं मनोमनी रंगवलेलं असतं. तिथल्या मोठय़ा झोपाळ्याचाही तिला मोह पडलेला असतो. पण आता सर्वच संपतं. आपण बिनलग्नाचेच राहणार, या निराशेनं ती ग्रासते.
मात्र, तिचे वडील प्रयत्न सोडत नाहीत. मुंबईत पोस्टात कामाला असलेल्या मुलाचं स्थळ येतं तेव्हा त्याची फार चिकित्सा करत न बसता कुसुमचं लग्न ते उरकून टाकतात. उशिरा का होईना, झालेल्या या लग्नानं कुसुम सुखावते. संसारात रमून जाते. तिला यथाकाल मुलगा होतो.
दरम्यान, प्रोफेसरांचंही लग्न होतं. तेही संसाराला लागतात. त्यांनाही मुलं होतात. दोघांचीही मुलं मोठी होतात. लग्नाच्या वयाची होतात. कुसुमला खूप आतून वाटत असतं, की ज्या घराचं स्वप्न आपण रंगवलं होतं, त्या प्रोफेसरांचीच मुलगी सून म्हणून आपण घरात आणावी. आणि तेव्हा नाही, पण आता तरी त्या घराशी नातं जुळवून आणावं. ती प्रोफेसरांच्या लीलूचं स्थळ आपल्या मुलासाठी पाहायला म्हणून नाशिकला येते..
.. आणि एखाद्या सराईतासारखं त्या घरात वावरते. इतकं, की जणू ती त्या घरचीच आहे असं कुणालाही वाटावं. प्रोफेसर आणि त्यांच्या घरातल्यांना कुसुमला पाहून प्रचंड धक्का बसतो. लीलूबरोबर आपल्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून कुसुम थेट लीलूलाच साकडं घालते. पण प्रोफेसर या लग्नास चक्क नकार देतात. कुसुमचं स्वप्न पुनश्च भंग पावतं. लीलूचं आणि कुसुमच्या मुलाचं- दोघांचीही लग्नं इतरत्र ठरतात व पारही पडतात. झालं-गेलं विसरून मुलाच्या सुखातच सुख मानण्याचं कुसुम ठरवते.
.. एके रात्री कशी कुणास ठाऊक, कुसुमला मधेच जाग येते. त्यांच्या घरातल्या झोपाळ्यावर बसून लीलू झोके घेत असते!
रहस्याच्या अंगानं जाणारी मतकरींची ‘झोपाळा’ ही कथा नाटय़रूपात साकारताना त्यातलं धक्कातंत्र कायम राहील याची दक्षता दिग्दर्शकांनी कसोशीनं घेतली आहे. वरपांगी ही एका अतृप्त स्त्रीची वास्तव कथा असली, तरीही तिला रहस्याची फोडणी देऊन ती अद्भुतरम्य केली गेली आहे. परिणामी ती प्रेक्षकांना शब्दश: खुर्चीला खिळवून ठेवते. कुसुमचं अतृप्तपण दाखवताना मात्र तांत्रिकतेत हे सादरीकरण अनावश्यकरीत्या थोडंसं अडकलं आहे. ते योग्य नव्हे. अन्यथा या सादरीकरणात नाव ठेवायला जागा नाही. पराग ओझा, सुशील जाधव आणि कृणाल आळवे या तिघांनी दिग्दर्शित केलेल्या या कथानाटय़ात त्यांच्या एकरूप सृजनाचा उत्तम प्रत्यय येतो. अनेकस्थळी घडणाऱ्या या कथा लवचिक नेपथ्यामुळे सहजशक्य झाल्या आहेत. जयदीप आपटे यांच्या प्रकाशयोजनेनंही यात मोलाची कामगिरी बजावली आहे. समीहन यांच्या संगीताचाही यात महत्त्वाचा वाटा आहे.
वेदांगी कुळकर्णी हिने कुसुमची व्यथा-वेदना उत्कटतेनं व्यक्त केली आहे. तिचं अतृप्तपण, तिची नाशकातल्या घराबद्दलची अनावर ओढ तिच्या वावरण्यातून तीव्रतेनं जाणवते. प्रोफेसर झालेल्या विभव राजाध्यक्षने आपली भूमिका भारदस्तपणे वठवली आहे. सुब्रतो सिंगने कुसुमच्या वडलांचं प्रेमळ, परिपक्व रूप छान पेललं आहे. लीलूचं अल्लडपण भाग्यश्री शंकपालनं समूर्त केलं आहे. कुसुमचा सरळमार्गी नवरा यशोमान आपटेनं नेटकेपणी उभा केला आहे. अन्य कलाकारांचीही त्यांना चोख साथ मिळाली आहे.
एकाच शीर्षकाच्या दोन कथांचा हा नाटय़गुच्छ प्रेक्षकांच्या हृदयास स्पर्श करतो यात शंकाच नाही.
झोपाळा
कथेचं नाटय़रूपांतर मराठी रंगभूमीला नवं नाही. पूर्वापार ते होत आलेलं आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे प्रा. देवेंद्र राज अंकुर यांना मात्र ‘कहानी का रंगमंच’ ही संकल्पना जणू आपणच प्रथम शोधून काढली असं वाटतं
First published on: 22-06-2014 at 03:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zopala a marathi play