रेश्मा राईकवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाती आहेत, पण सहवास नाही. जीवाला जीव देणारे मित्रमैत्रीण आहेत तरीही जो तो आपापल्या जगात एकाकीच आहे. अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी नव्हती, असा सूर लावण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक नव्या पिढीची आपली एक जगण्याची आधुनिक शैली विकसित होत जाते. जगण्याच्या, आयुष्यात काही करून दाखवण्याच्या घाईगर्दीत काही नाती निसटतात, काही घट्ट मुठीत राहतात. आपल्या माणसांपासून दूर होण्याची कारणं काळानुसार वेगवेगळी असतील कदाचित.. ‘खो गए हम कहाँ’ नावाने आलेल्या मैत्री आणि तरुणाईच्या ताज्या गोष्टीत हे कारण अर्थातच ‘डिजिटल’ तंत्रज्ञान आहे. एखादी व्यक्ती चांगली आहे की वाईट हे ठरवण्यापासून आपल्या आयुष्याशी त्याला जोडून घेण्यापर्यंतचे सगळे निर्णय प्रत्यक्ष त्या माणसाचा शोध न घेता मोबाइलच्या खिडकीवर दिसणाऱ्या त्याच्या वा तिच्या आयुष्याची पडताळणी करून घेतले जातात. या डिजिटल खिडकीत हरवणाऱ्या माणसांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचा विषय तितकाच ताजा आहे हे मान्य करायला हवं.

झोया अख्तर आणि रीमा कागती लेखक – दिग्दर्शक जोडीने काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर ‘द आर्चीज’सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून साठच्या दशकातील तरुणाईची काल्पनिक कथा कॉमिक पात्रांच्या आधारे रंगवून उभी केलेली आपण पाहिली. तिथेही मैत्रीची गोष्ट होती. उच्चभ्रू वातावरण होतं. ‘खो गए हम कहाँ’ या चित्रपटातही तरुण पिढी, त्यांची मैत्री, त्यांचा सामाजिक वावर, आर्थिकदृष्टय़ा सक्षमता मिळवून देणाऱ्या नोकरी-व्यवसायाची चिंता आणि अर्थातच आपल्या प्रेमाचा शोध हे सगळे पैलू आहेत. या चित्रपटावर रीमा आणि झोया यांच्या चित्रपट शैलीचा प्रभाव आहेच. निर्मिती त्यांची आणि फरहानच्या एक्सेल एन्टरटेन्मेटची आहे. चित्रपटाची कथालेखन आणि दिग्दर्शन अर्जुन वरैन सिंग याने केलं आहे, पण पटकथा लेखन अर्थातच रीमा-झोया जोडीचं आहे. त्यामुळे विषयातल्या ताजेपणाचं श्रेय अर्जुनलाच द्यावं लागेल. या चित्रपटाची एकच एक सरळ कथा नाही. इमाद, नील आणि अहाना या तिघांची मैत्री कथेच्या केंद्रस्थानी आहे. तिघांमध्येही घट्ट आणि शुद्ध मैत्री आहे. अहाना आणि इमाद एकाच खोलीत राहतात, तर नील आपल्या कुटुंबाबरोबर राहतो आहे. त्यातल्या त्यात अहाना आणि इमाद उच्चभ्रू कुटुंबातील आहेत, तर नील मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. मात्र आर्थिक तफावत वगैरे अशा गोष्टी त्यांच्या मैत्रीआड येत नाहीत. स्टॅण्ड अप कॉमेडियन असलेला इमाद कायम टिंडर अ‍ॅपवर अडकलेला असतो. रोज नव्या मुलींना शोधून त्यांच्याबरोबर संभोग करण्याचं त्याचं व्यसन आहे, अहानाचा प्रियकर रोहन तिला अचानक एके दिवशी आपल्याला या नात्यातून ‘ब्रेक’ हवा आहे हे सांगून बाहेर पडतो. आणि रोहनचं नेमकं काय सुरू आहे, त्याला हे नातं का नको आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्याने अहाना सतत त्याला समाजमाध्यमांवरून पडताळत राहते. तर जिम ट्रेनर असलेल्या नीलला स्वत:ची जिम सुरू करायची आहे. त्यासाठी त्याला सेलिब्रिटी ग्राहक हवेत. श्रीमंतीच्या खोटय़ा कल्पनांमध्ये अडकलेला नीलही एका अर्थाने समाजमाध्यमांवर पडीक आहे. त्याचं पुढे जाणं हे स्टारबरोबर सेल्फी, प्रभावक (इन्फ्लुएन्सर्स) यांच्या इर्दगीर्द फिरतं आहे.

हेही वाचा >>>वर्षअखेरीस जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ने मारली बाजी! टीआरपीच्या शर्यतीत ‘या’ आहेत टॉप १० मालिका, पाहा संपूर्ण यादी

या तिघांचे आपापले संघर्ष, आजच्या काळानुसार समाजमाध्यमांवर त्यांची उत्तरं शोधण्यात वा प्रत्यक्ष आयुष्यात आलेलं नैराश्य हटवण्यासाठी समाजमाध्यमांवर आपली खोटी प्रतिमा निर्माण करत इतरांकडून वाहवा मिळवण्यात हे तिघेही इतके गुंतत जातात की त्यांच्या त्यांच्यात एका क्षणी कधी दुरावा निर्माण होतो त्यांचं त्यांनाही कळत नाही. अर्थात, निखळ-सुंदर मैत्रीचं नातं कधी निराश करत नाही. फक्त त्या मैत्रीचा हात घट्ट धरून ठेवता यायला हवा, हे सांगण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यामुळे हा चित्रपट इतरांपेक्षा वेगळा वाटतो. सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव या तीन तरुण कलाकारांची निवडही चित्रपटासाठी योग्य ठरली आहे. सिद्धांतने याआधीही मोठे चित्रपट केले आहेत, मात्र इमादच्या भूमिकेत त्याला अधिक चांगला वाव मिळाला आहे. अनन्या पांडे कायमच अशा भूमिकांमध्ये सुसह्य वाटते. या दोघांच्या तुलनेत आदर्श गौरव अभिनयात उजवा आहे. आणि त्याने ते नीलच्या भूमिकेतून हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या तिघांची गोष्ट पाहताना नाही म्हटलं तर ‘दिल चाहता है’मधला सिद (अक्षय खन्ना) क्वचित समीरचा खटय़ाळपणा आणि या तिघांच्या मैत्रीतली धमाल आठवते. त्यात गंमत अधिक होती, इथे गमतीपेक्षा विषय पुरेशा गांभीर्याने मांडण्यावर दिग्दर्शकाने भर दिला आहे. पण मुद्दा हाच की तरुण पिढीचं कुठेतरी गुंतत जाणं, आपलं काही शोधणं हे विषय आजही तसेच आहेत. मात्र या पिढीची गोष्ट डिजिटल खिडकीच नव्हे तर त्याच माध्यमांतून समोर येणाऱ्या वा दिसणाऱ्या तथाकथित सामाजिक, वलयांकित खोटय़ा विश्वात गुंतून पडली आहे. यावर बोट ठेवत त्या संदर्भातून गोष्ट सांगण्याचा केलेला प्रयत्न यामुळे ‘खो गए हम कहाँ’ हा चित्रपट ताजा अनुभव ठरतो.

खो गए हम कहाँ

दिग्दर्शक – अर्जन वरैन सिंग

कलाकार -सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, आदर्श गौरव, कलकी कोचलिन, आन्या सिंह, विजय मौर्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zoya akhtar and reema kagti writer director netflix the archies is a fictional story of youth in the sixties amy