व्यापकाची असो की संकुचिताची असो; कल्पना ही अखेर कल्पनाच. जेव्हा विवेक होईल तेव्हा दोन्ही कल्पना मावळून स्वरूपज्ञानातच विलीन होतील. (मुळीं कल्पना दोरुपें तेचि जाली। विवेकें तरी स्वस्वरूपीं मिळाली।। १७२।।). या स्वरूपाची जाणीव लोपते तेव्हाच अहंकाराचा उदय होतो आणि तो संपूर्ण जीवन व्यापून टाकतो. ज्या मार्गानं विचार करावा त्या मार्गानं त्या विचारावर अहंभावच आरूढ होतो आणि त्या विचाराचं अविचारात रूपांतर करतो. त्यामुळे विवेकपूर्वक विचार करून शोध घ्यायला समर्थ  सांगतात (स्वरूपीं उदेला अहंकारराहो। तेणें सर्व आच्छादिलें व्योम पाहों। दिशा पाहतां ते निशा वाढताहे। विवेकें विचारें विवंचूनि पाहें।। १७३।।). ज्याचा शोध घ्यायचा आहे तो सद्गुरू कसा आहे? समर्थ सांगतात, तो या डोळ्यांनी दिसत नाही (जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना।), पण तो जेव्हा माझ्या भवविषयांचा ग्रास घेतो तेव्हा त्या भवाचं रक्षण काही केल्या मला साधत नाही. त्या भवातच माझं मन मात्र पूर्ण अडकलं असतं आणि त्यामुळे या भवाचा निरास  करण्याचं कार्य अतिशय नाजूकपणे करावं लागतं. माझ्याकडे अशाश्वताचा कितीही संग्रह असला, तरी तो टिकत नाही. तो नाशच पावतो. हा सद्गुरू मात्र क्षयातीत आहे. अर्थात त्याला अंत नाही. तो मलाही तसाच अक्षय मोक्ष देतो. अर्थात जगत असतानाही माझं मन मुक्तपणे, निर्भयपणे, निश्चिंतपणे, नि:शंकपणे वावरत असतं. तो दया करण्याबाबत दक्ष असतो आणि त्याच्यापासून काहीही लपत नसलं, तो सर्वाचा साक्षी असला, तरीही त्या दयाभावामुळेच तो शिष्याचाच पक्ष घेतो, शिष्याचाच कैवार घेतो. (भवा भक्षितां रक्षितां रक्षवेना। क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो। दयादक्ष तो साक्षिनें पक्ष घेतो।। १७४।।). आता १७५ ते १७८ हे श्लोक टप्प्याटप्प्याने सद्गुरूकडेच संकेत करतात आणि १७९वा श्लोक हा तर कळस आहे! समर्थ विचारतात, ‘‘ब्रह्मदेव प्राण्यांना जन्माला घालताना त्यांच्या ललाटीची रेषा नोंदतो, पण त्याच्या कपाळी त्याचं भागधेय कोण लिहितो? संहारकाळी महादेव सर्व जाळून टाकतो, पण त्याचा लय अखेर कोण करतो? (विधी निर्मितां लीहितो सर्व भाळीं। परी लीहितो कोण त्याचे कपाळीं। हरू जाळितो लोक संहारकाळीं। परी सेवटीं शंकरा कोण जाळी।। १७५।।). १७६व्या श्लोकात समर्थ सांगतात की, या विश्वात १२ आदित्य आणि ११ रूद्र आहेत. इंद्र तर असंख्य होत असतात. त्यांची गणति कोण करतो?  (जगीं द्वादशादित्य हे रूद्र अक्रा। असंख्यात संख्या करी कोण शक्रा।). अर्थात ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्याहीपलीकडे कुणीतरी आहे. आदित्य, रूद्रापासून  इंद्रांपर्यंत अनेकानेक देवांचाही कुणीतरी नियामक आहे!  या जगात त्याचा शोध घेऊनही तो गवसत नाही आणि संतजनांमध्येच असूनही तो मुख्यदेव कोणता हे कळत नाही! (जगीं देव धुंडाळितां आढळेना। जनीं मुख्य तो कोण कैसा कळेना।। १७६।।). हा जो खरा देव आहे.. हे जे परमतत्त्व आहे ते कसं आहे? ते तुटत नाही, फुटत नाही, चळत नाही, ढळत नाही, कधीच दैन्यवाणं होत नाही. ते या लोचनांना कधीच आकळत नाही की संतजनांमध्येच असूनही मीपणामुळे गवसत नाही की दिसत नाही. (तुटेना फुटेना कदा देवराणा। चळेना ढळेना कदा दैन्यवाणा। कळेना कळेना कदा लोचनासी। वसेना दिसेना जनीं मीपणासी।। १७७।।). संतसहवासाच्या योगे खऱ्या सद्गुरूपर्यंत पोहोचूनही त्याची जाणीव होत नाही. त्याचं खरं महत्त्व उमगत नाही. तो अत्यंत साधेपणानं राहात असतो आणि डामडौल दाखवत नसतो. जिथं गर्दी असते आणि चमत्कारांचा, ‘दिव्य अनुभवां’चा गवगवा असतो तिथं साधक धाव घेतो आणि जो खरा अगदी निकट अंतरात आहे त्यालाच अंतरतो!

 

 

Story img Loader