एकदा सद्गुरू म्हणाले की, ‘‘जोपर्यंत आपल्या आंतरिक स्थितीत बदल होणार नाही, तोपर्यंत आपल्या प्राप्तीत बदल होणार नाही! आंतरिक स्थिती सदोदित भौतिकाच्याच विचाराची असते आणि म्हणून नेहमी भौतिकाचीच प्राप्ती होत असते. या क्षणापासून जर आंतरिक स्थिती पारमार्थिक झाली तर परमेश्वराचीच प्राप्ती होईल!’’ हे वाक्य वरवर पाहता सोपं वाटतं, पण त्याचा खरा रोख नीट लक्षात आला तर त्यात आपल्या मनाची चुकीची घडण आणि त्यापायी सुरू असलेली फरपट मांडली आहे, हे जाणवेल. मुळात ही आंतरिक स्थिती म्हणजे काय? तर आपल्या मनाची ओढ कुठं आहे, आपले विचार, भावना, कल्पना, वासना कोणत्या विषयाशी अधिक केंद्रित असतात, त्यानुसार आपली आंतरिक स्थिती घडत असते. आपल्या मनावर बाह्य़ जगाचा स्वाभाविक प्रभाव आहे आणि त्यामुळे आपल्या विचार, कल्पना, भावना आणि वासना या जगाशीच जखडलेल्या आहेत. हे जगसुद्धा जसं आहे तसं आपल्याला जाणवत नाही, तर आपण ते आपल्याच भिंगातून पाहात असतो. आपण स्वत:च या जगाचा केंद्रबिंदू असतो. म्हणजेच या जगातली आपली प्रत्येक हालचाल, प्रत्येक व्यवहार, प्रत्येक वर्तन हे आपल्या सुखासाठीच असतं. हे सुख बाह्य़ जगाच्याच, अर्थात ज्याला भौतिक परिस्थिती म्हणतात, त्या भौतिक परिस्थितीच्याच आधाराने प्राप्त होईल, अशी आपली धारणा असते. त्यामुळे आपल्या मनाची ओढ, आपल्या भावना, कल्पना, विचार आणि वासना या भौतिक जगाशीच जखडलेल्या असतात. अर्थात आपली आंतरिक स्थिती ही सदोदित भौतिकाचीच असते. हे जे जग आहे, हे जे भौतिक आहे ते स्थूल वस्तू आणि व्यक्तींनी भरलेलं आहे. या वस्तू आणि व्यक्तींचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव असतो. त्या वस्तू आणि व्यक्तीच आपल्या जीवनातील सुखाचा आणि दु:खाचाही आधार असतात. हव्याशा वाटणाऱ्या वस्तू आणि व्यक्ती मिळण्यात सुख वाटतं, नकोशा वाटणाऱ्या वस्तू आणि व्यक्ती लाभण्यात दु:खं होतं. त्यातही आज हवीशी वाटणारी वस्तू वा व्यक्ती कालांतरानं नकोशीही होऊ शकते, हा भाग वेगळा! आपलं जीवनच नव्हे, तर समस्त वस्तू आणि व्यक्तीही काळाच्याच पकडीत असतात. त्यामुळे झीज, घट, हानी आणि नाश हे काळाचे नियम त्यांनाही लागू होतात. त्यामुळे या वस्तू आणि व्यक्तींशी आपला कधी संयोग होतो, तर कधी वियोग. त्या कधी आपल्याला अनुकूल असतात, तर कधी प्रतिकूल. कधी त्या आपल्या मनाजोगत्या भासतात, तर कधी मनाविरुद्ध भासतात. त्यातूनच सुख आणि दु:ख अधिक तीव्रपणे जाणवत असतं. या सुख-दु:खानुसारच आपल्या जीवनात जन्मापासून अनेक चढउतार सुरू असतात. तेव्हा आंतरिक स्थिती सदोदित भौतिकातच जखडली असल्यानं प्राप्तीही भौतिक सुख आणि दु:खाशीच जखडलेली असते. सद्गुरू सांगतात, जर भौतिकात अडकलेलं मन भौतिकाच्या आसक्तीपासून मोकळं झालं, तरच आंतरिक स्थितीत पालट सुरू होईल. असं असलं तरी भौतिकाचा मनावरचा प्रभाव सहजासहजी सुटत मात्र नाही. भौतिकाशी जखडून मनावर आसक्तीचा जो गंज चढला आहे तो खरवडण्यासाठी शुद्ध विचाराचीच गरज असते. हा बोधविचार जसजसा अंत:करणात शिरू लागतो तसतसं मन व्यापक होऊ लागतं. आंतरिक स्थितीत बदल होऊ लागतो आणि तसतसा प्राप्तीतही बदल होऊ लागतो.
चिंतनधारा : ३. स्थिती तशी प्राप्ती
आंतरिक स्थिती सदोदित भौतिकाच्याच विचाराची असते आणि म्हणून नेहमी भौतिकाचीच प्राप्ती होत असते.
Written by चैतन्य प्रेम
आणखी वाचा
First published on: 03-01-2018 at 01:56 IST
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual philosophy