विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

गेल्या आठवडय़ात शुक्रवार रात्र ते शनिवार पहाटेपर्यंतच्या  कालखंडात महाराष्ट्रामध्ये घडलेल्या सत्तानाटय़ाने राज्यशास्त्रामध्ये एक वेगळा अध्याय तर लिहिला जाईलच; मात्र त्याचबरोबर केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राज्यकारणाला एक वेगळी कलाटणी मिळेल अशी शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आकाराला आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नव्या महाआघाडीची दखल भाजपाच्या उधळलेल्या महत्त्वाकांक्षी वारूलाही घ्यावीच लागली. किंबहुना म्हणूनच ‘राजा’श्रयाने रातोरात घडलेले सत्तानाटय़ देशाने पाहिले. अन्यथा असे काय होते की, त्यामुळे ‘ज्यांची जागा आर्थर रोड कारागृहामध्ये आहे’ असे आरोप करून ज्यांना धडा शिकवण्याची भाषा करत सत्तास्थानी पोहोचले त्याच आरोपिताच्या मांडीला मांडी लावून सत्ताकारणाची नवी दिशा ठरविण्याचा मोह भाजपाला आणि पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना व्हावा? ‘कोणत्याही परिस्थितीत आमदारांची फोडाफोडी करणार नाही’ असे जाहीररीत्या वारंवार सांगितले तेच विधान फिरवत सत्तानाटय़ाचा नवा अध्याय भाजपाने रचला. महाराष्ट्राच्या सत्तानाटय़ामध्ये नेमके काय होणार ते सोमवारी हे ‘मथितार्थ’ लिहीत असताना स्पष्ट नव्हते. तरी एव्हाना काही बाबी मात्र पुरत्या स्पष्ट झाल्या आहेत.

या सत्तानाटय़ानंतर कुणी कुणाचा गेम केला किंवा पाठीत खंजीर खुपसला, त्याची चर्चा सुरू झाली. शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी किंवा त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी साधनशुचिता सांगणाऱ्या भाजपाने एवढे टोक गाठावे, हे कोणत्याही सुज्ञास न पटणारे आहे. ज्या वेगात राजाश्रयाने या घडामोडी घडल्या तो वेगही आजवर राज्यात कधीच दिसला नाही. विनोद असा की, शेतकऱ्यांसाठी आणि सामान्यांसाठी केले असा आणलेला आव! महाराष्ट्रातील घडामोडींचे परिणाम देशाच्या राजकारणावर होण्याची गंभीर शक्यता दिसताच भाजपातील धुरीणांनी चाली रचल्या.

पार्थ पवार यांच्या पराभवाचा वर्मी लागलेला घाव, रोहित पवार यांना मिळणारा अधिकचा प्रतिसाद आणि सुप्रिया सुळे यांचे वाढलेले महत्त्व ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून फुटून निघण्याच्या चालीमागची कारणे आहेत असे मानले जाते. चाल एकच, त्यात भाजपाने सेनेवर, फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर, तर अजित पवार यांनी शरद पवारांवर उगवलेला सूड असे याचे वर्णन करण्यात आले. कोणी काय केले आणि कुणी कुणावर सूड उगवला याची चर्चा आणि विश्लेषण नंतर दीर्घकाळ होत राहील. मात्र या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी शरद पवार हेच राहिले. उडत्या पक्ष्यांची पिसे मोजणाऱ्या पवार यांना हे कळले नाही का, की पुतण्या फुटून जातो आहे, अशीही शंका व्यक्त झाली. पण यानिमित्ताने वारसदार म्हणून सुप्रिया सुळे यांना पुढे करण्याचा पवार यांचा मार्ग या सत्तानाटय़ामुळे परस्पर मोकळा झाला आहे, हेही महत्त्वाचेच.

कुणालाही सत्ता कशासाठी हवी असते या प्रश्नाचे पहिले उत्तर हे अर्थकारण असले तरी दुसरे उत्तर राजकीय सूड हेच असते हे आजवर भारतीय राजकारणात वारंवार सप्रमाण सिद्ध झाले आहे. मायावती वि. मुलायम सिंग, जयललिता वि. करुणानिधी, बादल वि. अमरिंदर आणि अलीकडच्या अध्यायात पी. चिदम्बरम वि. अमित शहा. (दोघांचीही गृहमंत्री पदाची कारकीर्द आणि त्यातील कुरघोडी आठवून पाहा.) आता या अध्यायात नवीन भर पडली आहे ती फडणवीस वि. ठाकरे आणि आता पवार (कनिष्ठ) वि. पवार (ज्येष्ठ) ही! सत्ता कशासाठी, या प्रश्नाच्या उत्तरातील हा एक महत्त्वाचा लपून न राहिलेला असा कोन आहे!