गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी दीड हजारापर्यंत रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत मंगळवारी १००२ नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांचा आकडा ३२,७९१ वर गेला आहे. तर मंगळवारी ३९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून करोनाबळींची एकूण संख्या १०६५ झाली आहे.
मुंबईतील रुग्णसंख्येत मंगळवारी काहीशी घट झाली असून १००२ रुग्ण आढळून आले. तर ४१० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ८८१४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ८६६ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. २५ मे पर्यंत मुंबईत १ लाख ७४हजार ८४१ चाचण्या करण्यात आल्या असून त्यात १८ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत.
प्रत्येक बाधित रुग्णामागे दहा ते पंधरा निकट संपर्क शोधण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. त्यानुसार मंगळवारी २४ तासात अतिजोखमीचे ८२९३ संपर्क शोधण्यात आले आहेत. कोविड काळजी केंद्र १ मध्ये अति निकटचे संपर्क दाखल केले जातात. सध्या सीसीसी १ मध्ये १६,६५१ अतिजोखमीचे संपर्क दाखल करण्यात आले आहेत.
३९ मृतांपैकी १४ रुग्णांना कोणतेही अन्य आजार नव्हते. तर ४ रुग्णांचे वय ४० वर्षांंच्या आतील आहे. मृतांमध्ये २८ पुरुष आणि ११ महिला आहेत.
नवी मुंबईत ६३ रुग्णांची वाढ
नवी मुंबई- नवी मुंबईत दिवसागणिक करोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असून मंगळवारी ६३ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची संख्या १७७४ झाली आहे. तर मंगळवारी २ जणांचा मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ५४ झाली आहे. शहरातून आतापर्यंत ८०२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. पनवेलमध्ये मंगळवारी ९ नवे करोनाबाधित आढळले, तर करोना संसर्ग झालेले १९ रुग्ण मंगळवारी बरे झाले. मंगळवारी आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरचा समावेश आहे.
१६२१ धारावीकर करोनाग्रस्त
करोनाच्या संसर्गाने थैमान घातल्यामुळे धारावीकर प्रचंड घाबरले असून धारावीतील अनेक कामगारांनी गावची वाट धरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच वेळी मंगळवारी ३८ धारावीकरांना करोनाची बाधा झाली असून आतापर्यंत करोनाची बाधा झालेल्या धारावीकरांची संख्या १६२१ वर पोहोचली आहे. तर येथील माटुंगा लेबर कॅम्प परिसर अत्यंत धोकादायक बनू लागला आहे. येथील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ २१ दिवसांवर आला आहे.
अग्निशमन दल जवानाचा करोनामुळे मृत्यू
करोनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मोठया संख्येने बाधित झालेले असताना आता अग्निशामक दलालाही त्याची झळ पोहोचू लागली आहे. सोमवारी अग्निशामक दलातील एका जवानाचा करोनाने बळी घेतला आहे. तर एकूण अग्निशामक दलातील तब्बल ३५ जण बाधित झाले आहेत. मुंबईत करोनाचा संसर्ग वाढत असून डॉक्टर, परिचारिका, पोलिस, बेस्टच्या कर्मचारी यांच्या पाठोपाठ आता अग्निशामक दलातील कर्मचारीही मोठय़ा संख्येने बाधित झाले आहेत. त्यातच नानाचौकातील गोवालिया टॅंक अग्निशामक केंद्रातील ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. अग्निशामक दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.