सात जण जखमी; मृतांमध्ये आठ मुलांचा समावेश

मुंबई : मालाड मालवणी येथे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दीड वर्षांच्या मुलीसह आठ मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला.

मालवणीतील अब्दुल हमीद रस्त्यावर गेट क्रमांक ८ जवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील जमिनीवर ही बेकायदा इमारत होती. सहा वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. लोखंडी अँगलच्या साहाय्याने तळमजला आणि त्यावर आणखी तीन मजले उभारण्यात आले होते. तिथे इमारतीच्या मालकासह आणखी दोन भाडेकरू वास्तव्याला होते. इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बुधवारी रात्री बाजूच्याच एकमजली इमारतीवर कोसळला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस दल आणि महापालिकेकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला तर सात जणांना वाचविण्यात यंत्रणांना यश आले.

जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार

जखमींना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. एका महिलेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतिमा पाटील यांनी दिली.

जखमींची नावे

पुमारी कुमार इरन्ना, धनलक्ष्मी बेबी, सलीम शेख, रिझवाना सय्यद, सुर्यमणी यादव, करीम खान, गुलजार अहमद अन्सारी

सर्व प्राधिकरणांची लवकरच बैठक : महापौर

महापौरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी के ली. ‘ही दुर्घटना दुर्दैवी असून, गेल्या वर्षी विविध प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या धोकादायक इमारतींबाबत सर्व संबंधित प्रमुखांची बैठक घेतली होती. येत्या मंगळवारी किंवा बुधवारी संबंधित विविध प्राधिकरणांच्या प्रमुखांची पुन्हा बैठक आयोजित करून यातून ठोस निर्णय घेण्यात येईल. करोनाच्या काळामध्ये विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्याबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने बैठकीत सर्वंकष चर्चा करण्यात येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

दुर्घटनाग्रस्त इमारतीचे मालक रफिक सिद्धीकी यांच्या कुटुंबातील ९ जणांचा, तर अन्य दोन भाडेकरूंच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याचा मृत्यू झाला. रफिक यांची पत्नी, भाऊ, वहिनी आणि सर्व मुलांचा मृत्यू झाला. दुर्घटनेपूर्वी काही मिनिटे रफिक हे दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्याने ते वाचले. त्यांच्याबरोबर घरातील अन्य एक मुलगाही बचावला.

कंत्राटदाराला अटक

पोलिसांनी इमारतीचे मालक रफिक सिद्धीकी आणि कंत्राटदार रमजान शेख यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. रमजान शेख याला अटक केल्याचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले. सहआयुक्त विश्वाास नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत अवैध होतीच, पण इमारतीचे बांधकाम, अंतर्गत रचना सदोष होती. या आधी झालेल्या पडझडीनंतर वेळीच डागडुजी उपाययोजना केली असती तर हा अपघात घडला नसता. दरम्यान, येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या भूखंडांवर मोठ्याप्रमाणात अवैध बांधकामे झाली असून प्रत्येक बहुमजली घराचे, इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करणे आवश्यक आहे, अशी सूचना मालवणी पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिली आहे.

मालकाने दुर्लक्ष केल्याने दुर्घटना?

दुर्घटनाग्रस्त इमारत पूर्णपणे लोखंडी अँगलवर उभारली होती. तिच्या भिंतीला तौक्ते वादळानंतर भेगा पडल्या होत्या. त्याबाबत मालकाशी बोलणे झाले होते. इमारतीची दुरूस्ती करणार असल्याचे मालकांनी सांगितले होते. मात्र त्यापूर्वीच इमारत कोसळली.

बेकायदा इमारतींचे बांधकाम

मालवणी भागात कंत्राटदारांकडून या बेकायदा इमारती बांधल्या जातात. बांधकाम करण्याची परवानगी आणि इतर गोष्टींची जबाबदारी तेच घेतात. त्यामुळे किती मजले बांधावेत याच्यावर कोणतेच नियंत्रण नसते. बांधकामही निकृष्ट दर्जाचे केले जाते. त्यातूनच ही दुर्घटना घडली, असे स्थानिक नागरिक मुनीर शेख यांनी सांगितले.

मृतांची नावे

साहील सर्फराज सय्यद (९), अरीफा शेख (९), शफीक सलीम सिद्दिकी (४५), तौसिफ शफीक सिद्दीकी (१५), अलिशा शफीक सिद्दीकी (१०), अल्फिसा शफीक सिद्दीकी (दीड वर्ष), अफिना शफीक सिद्दीकी (६), इशरत बानो शफीक सिद्दीकी (४०), रहिसा बानो शफीक सिद्दीकी (४०), तहेस शफीक सिद्दीकी (१२), जोहन इरान्ना (१३), युसू भाटिया (६०)

मृतांच्या वारसांना ५ लाख

मुंबई : मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. मुख्यमंत्र्यांनी कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन जखमींची विचारपूस केली.

दहिसरमध्ये तीन घरे  कोसळली; एकाचा मृत्यू

मुंबई : दहिसरमधील केतकीपाडा येथे गुरुवारी सायंकाळी तीन घरे कोसळली. या दुर्घटनेत प्रद्युम्न सरोज (२६) या तरुणाचा मृत्यू झाला. के तकीपाडा परिसरात शंकर मंदिर टेकडीवर ही दुर्घटना घडली. ही घरे डोंगर उतारावर असल्याने दरड कोसळून ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.