पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी सोमवारपासून वातानुकूलित लोकल गाडी चालवण्यात आली आणि एकच दिलासा प्रवाशांना दिला. काही प्रवाशांना जरी दिलासा मिळाला असला तरी या लोकलच्या फेऱ्यांसाठी साध्या लोकलच्या बारा फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुळातच वातानुकूलित लोकलचे भाडे प्रत्येक प्रवाशाला परवडणारे नाही. त्यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्या रद्द करून पश्चिम रेल्वेने काय साधले, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

२५ डिसेंबर ते २९ डिसेंबपर्यंत वातानुकूलित लोकलच्या प्रत्येक दिवशी सहा फेऱ्या होणार आहेत. तर १ जानेवारीपासून १२ फेऱ्या होतील. या फेऱ्या चर्चगेट ते बोरिवली, चर्चगेट ते विरार अप आणि डाऊन मार्गावर दरम्यान होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली होती. मात्र, वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी याच मार्गावर धावणाऱ्या एकूण बारा फेऱ्यांचा बळी देण्यात आल्याचा आरोपही प्रवाशांकडून केला जात आहे. या संदर्भात प्रवासी अक्षय मराठे यांनी आधीच्या लोकल फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकलचा त्यात समावेश केल्याचे सांगितले. ही बाब वातानुकूलित लोकलचा समावेश होण्यापूर्वीच्या वेळापत्रकातून लक्षात येते. मुळातच वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सांगणे कठीण आहे.

सध्याच्या लोकलच्या एका फेरीतूनही हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे वातानुकूलित लोकलचा प्रवास प्रत्येक प्रवाशाला परवडणारा नसल्याची बाब मराठे यांनी निदर्शनास आणून दिली. साध्या लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अन्य लोकलचा पर्याय शोधावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनीही २९ डिसेंबपर्यंत धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या दिवसभरात तीन अप आणि तीन डाऊनला फेऱ्या होणार आहेत. १ जानेवारीपासून लोकलच्या बारा फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्या चालवताना सध्याच्या १२ लोकल फेऱ्या चालवण्यात येणार नाहीत. त्यामुळे साध्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विनाकारण फटका बसणार आहे. त्याचा रेल्वे प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी केली आहे. यासाठी रेल्वेकडे पत्रव्यवहारही केला जाणार असल्याचे सांगितले.

या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Story img Loader