डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने ‘ग्रंथाली’चा उपक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षांच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे किमान १ हजार २५० संच महाराष्ट्रातील छोटय़ा-मोठय़ा वाडय़ा-वस्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले आहे. या संचात ‘ग्रंथाली’सह अन्य प्रकाशकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व साहित्याची प्रकाशित केलेली पुस्तके असणार आहेत. यात १२५ विविध पुस्तकांचा समावेश आहे.
यशवंत मनोहर लिखित ‘बाबासाहेब’ हा महाकविता संग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ‘महासूर्य’ हे दोन ग्रंथ येत्या ३० एप्रिलपर्यंत सवलतीत मिळणार आहेत. योजनेत ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ५० आणि अन्य प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या ७५ ग्रंथांचा समावेश आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेली दलित आत्मकथने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे व साहित्य, आंबेडकरी विचारांचे अन्य ग्रंथ यांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यापासून तरुणांना प्रेरणा मिळावी आणि समग्र आंबेडकरी विचार समाजापुढे मांडला जावा, या उद्देशाने ‘ग्रंथाली’तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध वाडय़ा आणि वस्त्यांवर प्रायोजकांची मदत घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ‘ग्रंथाली’कडून सांगण्यात आले. येत्या वर्षभर हा उपक्रम राबविला जाणार असून ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी ‘ग्रंथाली’शी ०२२-२४२१६०५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.