फलाटांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार पट्टय़ात प्रवाशांची वाढत जाणारी संख्या पाहता या दरम्यान धिम्या मार्गावर १५ डबा लोकल गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी फलाटांची लांबीदेखील वाढविण्यात येणार असून या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी दिली. कंत्राट दिल्यानंतर दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर १२ डबा लोकल गाडय़ा धावत आहेत. प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि लोकल गाडय़ांवर पडणारा ताण पाहता १२ डबा लोकल गाडय़ांना तीन डबे जोडून १५ डबा लोकलही चालविल्या जात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत अंधेरी ते बोरिवली या पट्टय़ात प्रवाशांची संख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे या भागातून गर्दीच्या वेळेत प्रवास करणे अशक्य झाले आहे. दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड आणि नालासोपारा स्थानकातून लोकलमध्ये प्रवेश करताना प्रवाशांना बरीच कसरत करावी लागते. एकंदरीतच हा प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने १५ डबा लोकलचे एक वेगळेच नियोजन केले आहे. प्रवाशांना दिलासा

अंधेरी ते विरापर्यंत धिम्या मार्गावर १५ डबा लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त प्रवासी यामधून प्रवास करू शकतील यादृष्टीने या दोन स्थानकादरम्यान १५ डबा लोकलच्या फेऱ्याही अधिक चालविल्या जाणार आहेत. अंधेरी ते विरापर्यंत १५ डबा लोकल चालविण्यासाठी फलाटांची लांबी वाढविणे गरजेचे आहे. या कामासाठी निविदा काढण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जैन यांनी दिली. त्यामुळे लोकल गाडय़ांवरील बराचसा ताण कमी होण्यास मदत मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.