एका दिवसात १५० जणांना परवानगी; अतिवर्दळीमुळे परिसंस्थेला धोका पोहोचत असल्याने निर्णय
ताम्हिणी घाटाजवळचे अंधारबन आणि पालीजवळच्या सुधागड किल्ल्यावर यापुढे दिवसाला केवळ १५० जणानांचा प्रवेश दिला जाणार आहे. पुणे वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. मागील वर्षांपासूनच अंधारबन आणि सुधागड परिसरातील गिरिपर्यटकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतला होता. मात्र तरीदेखील ६ आणि ७ जुलैला अंधारबनसाठी १० वेगवेगळ्या ग्रुपनी या ट्रेकचे आयोजन केले होते. त्या सर्वाना वनखात्याने परवानगीशिवाय या भागात जाता येणार नाही याची जाणीव करून दिली.
मागील आठवडय़ात हरिहर किल्ल्यावर झालेल्या अनियंत्रित गर्दीच्या पार्श्वभूमीवर सह्य़ाद्रीतील इतर किल्ल्यांवरील वाढत्या गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. हरिहरवर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आपत्ती निवारण यंत्रणेने नियंत्रण आणले आहे. तर अंधारबन आणि सुधागड येथे वनखात्याने आता कायद्याचा बडगा उचलला आहे. ‘‘अंधारबन आणि सुधागड ही दोन्ही ठिकाणं अभयारण्याचा भाग असून अतिवर्दळीमुळे तेथील परिसंस्थेला धोका पोहचत होता. त्यामुळे तेथील गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे होते. मात्र पूर्ण बंदी न करता गावकऱ्यांनादेखील रोजगार मिळावा या अनुषंगाने संख्येवर नियंत्रण आणल्याचे, पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी सांगितले. दिवसाला केवळ १५० गिरिपर्यटकांना या भागात सोडले जाणार असून एकावेळी २५ जणांना सोडण्यात येईल. दोन ग्रुपच्यामध्ये अर्ध्या तासाचे अंतर असेल असेदेखील त्यांनी नमूद केले.
पावसाळ्याच्या चार महिन्यात मुंबई, पुणे आणि नाशिक येथून सह्य़ाद्रीतल्या किल्ल्यांवर जाणाऱ्या गिरिपर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. किमान १००-१५० च्या मोठय़ा समूहाने हौशी गिरिपर्यटक या काळात डोंगरातला पाऊस अनुभवायला जात असतात. त्यामुळे एकूणच तेथील परिसंस्थेवर ताण पडतो. यावर नियंत्रण यायला हवे अशी मागणी काही वर्षांपासून गिर्यारोहकांकडून केली जात आहे. सह्य़ाद्रीच्या डोंगररांगेत लोहगड, राजगड, राजमाची, पेब, पेठ, हरिहर, गोरखगड, देवकुंड, अंधारबन, सुधागड ही ठिकाणं गेल्या काही वर्षांतील हॉट स्पॉट झाली आहेत. सर्व सुविधा पुरवणाऱ्या साहसी पर्यटन आस्थापनांकडून पावसाळ्याच्या काळात या ठिकाणी मोठय़ा संख्येने गिरिपर्यटनाचे आयोजन केले जात असते. सध्या काही ठिकाणी वनखाते व जिल्हाधिकाऱ्यांकडून नियंत्रण आणण्याचे प्रयत्न दिसून येतात.