प्रवासी घटल्याने दोन डबे कमी, मध्य रेल्वेकडून अंमलबजावणी

कोकण, गोवा मार्गावर दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या वातानुकूलित डबल डेकर एक्सप्रेसला प्रवाशांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने या गाडीचे दोन डबे कमी करण्यात आले आहेत. आता ही गाडी आता आठऐवजी सहा डब्यांची असेल. या एक्सप्रेसचे प्रवासी आणखी कमी झाले तर डबल डेकर बंद केली जाईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

सन २०१५मध्ये मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी अशी वातानुकूलित डबल डेकर एक्सप्रेस सुरू केली. सुरुवातीला ‘प्रीमियम’ प्रवासदर आकारला जात होता. मागणीनुसार हे भाडे वाढत असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत होती. त्यानंतर दरनिश्चित करण्यात आले. मात्र, डबल डेकरची लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ५.३० वाजता सुटण्याची वेळ, पश्चिम उपनगरातील रहिवाशांना गाडी पकडण्यासाठी करावी लागणारी कसरत या प्रवाशांच्या दोन्ही अडचणी दूर करण्यासाठी एक्सप्रेसची रवाना होण्याची वेळ बदलण्याची मागणी केली गेली. मात्र, त्याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. देखभाल-दुरुस्तीकडेही लक्ष दिले जात नव्हते. परिणामी, प्रवाशांनी डबल डेकरकडे हळूहळू पाठ फिरवली.

या रेल्वेगाडीला ४० टक्क्य़ांपेक्षाही कमी प्रतिसाद मिळू लागला. कधीकधी तर डबल डेकरमध्ये १५ ते २० टक्के जागाच भरलेल्या असत.

अखेर १६ फेब्रुवारी २०१८ पासून डबल डेकर गाडीचे आरक्षण प्रवाशांसाठी कायमचे बंद करण्यात आले. मात्र, त्याचा गाजावाजा झाल्यानंतर ही एक्सप्रेस बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिले. गाडी बंद करता येत नसल्याने आणि आठ डब्यांची गाडी चालविणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने मध्य रेल्वेने चेअर कार असलेली आठ डब्यांची ही डबल डेकर सहा डब्यांची केली असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

* लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव डबल डेकर आठवडय़ातील बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावते.

* डबल डेकर एक्सप्रेस सुरू झाली, तेव्हा प्रवाशांसाठी आठ डबे आणि दोन जनरेटर व्हॅन अशी रचना होती.

* आता प्रवाशांसाठी दोन डबे काढल्याने सहा डबे आणि दोन जनरेटर व्हॅन आहेत.