|| मंगल हनवते
कोंढाळकरवाडीतील १२ एकरावर दरडग्रस्तांसाठी ६० घरे
मुंबई : महाडमधील तळीये गावात कोंढाळकरवाडीतील दरडग्रस्तांच्या पुनर्वसन योजनेला वेग देण्यात आला आहे. सध्या दोन एकर जागेवर त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येत आहे. तर ६० कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे लागणार असून यासाठी कोंढारकरवाडीतील १२ एकर जागा निश्चिात करण्यात आली आहे. या जागेच्या संपादनासाठीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. दुसरीकडे म्हाडानेही ‘प्री फॅब’ पद्धतीच्या घरांचे दोन नमूने तयार करून घेण्यास सुरुवात केली असून आठवड्याभरात हे नमूने म्हाडा मुख्यालयात पहायला मिळणार आहेत.

तळीये गावातील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने घेतली आहे. तर राजयड जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा एकत्रितपणे ही जबाबदारी उचलत आहे. तळीयेतील कोंढारकरवाडीतील ६० घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यानुसार यासाठी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली सरकारी जमीन निश्चिात करण्यात आली होती, पण ही जागा दूर असल्याने याला गावकऱ्यांनी नकार दिला आहे. त्यानंतर गावातीलच १२ एकर खासगी जागा निश्चिात करण्यात आली आहे. ही जागा नियमानुसार संपादित करावी लागणार असल्याने लवकरच यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

जमीन संपादित झाल्यानंतर म्हाडाकडून येथे ‘स्टील फ्री फॅब’ पद्धतीचे घरे उभारून देण्यात येणार आहेत. घरांचा सर्व ढाचा एका ठिकाणी तयार करत तो  कोंढारकरवाडीत बसवण्यात येणार आहे. ही घरे तयार करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून घरांचे दोन नमूने तयार करून घेतले जात आहेत. हे दोन्ही नमूने आठवड्याभरात म्हाडा मुख्यालयात लावले जाणार आहेत. यातील एक नमूना निश्चिात करत त्या नमून्याची घरे मुंबईत तयार करत कोंढारकरवाडीत नेत तिथे बसवण्यात येतील. महिन्याभरात घरे बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने म्हाडाची तयारी आहे. तर हे काम काही आठवड्यातच पूर्ण करत सर्व कुटूंबाचे पुनर्वसन होईल. तेव्हा आता जमीन ताब्यात येण्याची प्रतीक्षा आहे.

मोठी घरे देण्याची मागणी

नियमानुसार पुनर्वसनाअंतर्गत ३०० चौ. फुटांची घरे दिली जातात.  येथे  ४०० चौ. फुटांची, १ बीएचके घरे देण्याची म्हाडाची तयारी आहे, पण गावकऱ्यांची ५०० चौ. फुटांच्या घरांची मागणी आहे. त्यानुसार अशी मागणी म्हाडाकडे करू असेही निधी चौधरी यांनी सांगितले आहे. तर ५०० चौ फुटांची घरे देण्याची तयारी असल्याचे म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

महाड, पोलादपूर, मुरुड येथील १६०० कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. सध्या कोंढारकरवाडीतील ६० कुटुंबांचे प्राधान्याने म्हाडाच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात येत आहे. यासाठी खासगी जमीन लवकरच संपादित केली जाईल. त्यानंतर म्हाडाकडून घरांचे काम मार्गी लावले जाईल. पुनर्वसनाची ही सर्व प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. -निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

फ्री फॅब पद्धतीच्या घरांचे दोन नमूने आठवड्याभरात तयार होतील. ही घरे म्हाडा मुख्यालयात लावण्यात येतील. यातील एक नमूना निश्चिात करत त्या प्रकारची घरे तळीये गावातील रहिवाशांना उपलब्ध करून देऊ. -अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष, म्हाडा