अपेक्षेप्रमाणे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेतेपदी बढती मिळाली. शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. निवड जाहीर होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचे नेतेपदही कायम ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिदे यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली.

राजकीय पक्षांना संघटनात्मक निवडणुकांची औपचारिकता पार पाडावी लागते. त्यानुसार पंचवार्षिक निवडणुकांची प्रक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वरळीच्या वल्लभभाई पटेल सभागृहात पार पडली. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. प्रभावशाली नेते आमदार अनिल परब यांच्याकडेही नेतेपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता होती. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. बाळकृष्ण जोशी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाची शिवसेना नेतेपदासाठी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर सभागृहात जल्लोष झाला. तसेच फटाके फोडण्यात आले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आनंदराव अडसूळ, अनंत गीते, चंद्रकांत खैरे यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली. खासदार अरविंद सावंत, आमदार नीलम गोऱ्हे, अनिल परब, डॉ. अमोल कोल्हे, मनिषा कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. मिलिंद नार्वेकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा, शेतकऱ्याना संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीचा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला.

Story img Loader