दोन मते अपात्र ठरली नसती तरीही गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत निसटता विजय शक्यच

गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी मते अधिकृत प्रतिनिधींऐवजी अन्य पक्षांच्या नेत्यांना दाखविल्याने काँग्रेसच्या दोन आमदारांची मते अपात्र ठरविण्यात आल्याने काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना विजय शक्य झाला. मात्र, तरीही पटेल यांना निसटता विजय मिळाला असता.

काँग्रेसच्या सहा आमदारांच्या राजीनाम्यानंतर गुजरात विधानसभेची सदस्यसंख्या १७६ झाली होती. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा कमी करण्याकरिताच सहा आमदारांना राजीनामे देण्यास भाग पाडण्यात आले. भाजपने तिसरी जागा जिंकण्यासाठी व्यवस्थित नियोजन केले होते. सहाने सदस्यसंख्या घटल्याने मतांचा कोटा कमी झाला. भाजपकडील अतिरिक्त ३१ मते आणि काँग्रेसच्या बंडखोरांच्या साहाय्याने तिसरी जागा जिंकण्यासाठी भाजपने व्यूहरचना केली होती.

राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. त्यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना मतदान केल्यावर मतपेटीत टाकण्यापूर्वी मतपत्रिका पक्षाने अधिकृत केलेल्या प्रतिनिधीला दाखवावी लागते. अपक्ष आमदारांना हे बंधन नसते. काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी आपल्या मतपत्रिका भाजप नेत्यांना दाखविल्याची तक्रार करण्यात आली. काँग्रेसच्या तक्रारीनंतर ती दोन मते बाद करण्यात आली. ही मते बाद झाल्यानेच अहमद पटेल यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

अहमद पटेल कसे निवडून आले?

  • दोन मते बाद झाल्याने १७४ मतदानानुसार मतांचा कोटा हा ४३५१ एवढा झाला.
  • अहमद पटेल यांना पहिल्या पसंतीची ४४ मते मिळाल्याने ते विजयी झाले. दोन मते बाद झाली नसती तर पहिल्या पसंतीच्या ४४०१ मतांची आवश्यकता होती.
  • पटेल यांना पहिल्या पसंतीची ४४ मते मिळाली. दोन मते बाद झाली नसती तर पटेल हे पहिल्या फेरीत निवडून येऊ शकले नसते.
  • अमित शहा आणि स्मृती इराणी यांना प्रत्येकी ४६ मते मिळाली. या दोघांची अतिरिक्त मते रजपूत यांना हस्तांतरित करण्यात आली असण्याची शक्यता आहे.
  • शहा आणि इराणी यांच्याकडील अतिरिक्त १९९ मतांचे मूल्य असलेली दोन मते भाजपचे तिसरे उमेदवार रजपूत यांना हस्तांतरित झाली असती.
  • १९९ गुणिले दोन = ३९८ मतांचे अधिक मूल्य तिसरे उमेदवार रजपूत मिळाले असते.
  • पटेल यांना पहिल्या पसंतीची ४४०० मते मिळाली. दोन मते बाद झाली नसती तर रजपूत यांच्या मतांची संख्या ४००० झाली असती. यामध्ये ३९८ मते अधिक केल्यावरही रजपूत यांच्या मतांची संख्या ४३९८ झाली असती. म्हणजेच पटेल हे .२ मतांनी विजयी झाले असते. अर्थात या साऱ्या गडबडीत काही जरी गोंधळ झाला असता तरी निकालावर त्याचा परिणाम झाला असता.
  • महाराष्ट्रात १९९८ मध्ये राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे सतीश प्रधान यांनी काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचा अवघ्या .१ मतांनी पराभव केला होता. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर १९९६ मध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शिवसेनेच्या मदतीने विधान परिषदेची निवडणूक लढविली होती. तेव्हाही देशमुख हे अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते.