संविधान, मतदारहक्क यांच्या जागृतीपासून बंधूभावाचीही शिकवण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी लाखोंच्या संख्येने जमलेल्या त्यांच्या अनुयायांनी चैत्यभूमीसह अवघा दादर परिसर भारून टाकला होता. संविधानाबाबत जागृती करणाऱ्या चित्रकृती, फलक, घोषणा, उपक्रम यांतून आंबेडकरी विचारांची ज्योत अनुयायांच्या मनात तेवत ठेवण्यासाठी झटणारे कार्यकर्ते गुरुवारी जागोजागी दिसत होते. ‘गेल्या वर्षी दगड खाल्ला, या वर्षी माती खायची नसेल तर तयारीला लागा आणि पुढच्या पिढीसमोर चांगला आदर्श निर्माण करा,’ असे संदेश देत फिरणारे समता सैनिक दलाचे तरुणही साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमी येथे देशभरातून दलित बांधव एकवटले होते. यामुळे दादर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतच्या मार्गावर फेरीवाल्यांची गर्दी पाहायला मिळत होती. मात्र या वेळी हे फेरीवाले इतर कोणतेही सामान न विकता भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विविधरंगी मूर्ती, त्यांची प्रतिमा असणारे लॉकेट्स, दिनदर्शिका इत्यादी विकत होते. टॅटू काढून घेण्यासाठीही बरीच गर्दी होत होती. एका अनुयायाची ‘जय भीम’च्या नावे केलेली केशभूषा लक्ष वेधून घेत होती. त्याच्यासोबतही अनेक जण फोटो काढून घेत होते. बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी हे विचार लिहिलेले फलक घेऊन काही तरुण उभे होते. तर बुद्धविहारासाठी आर्थिक मदतही मागितली जात होती.

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ते अडवले होते व दर्शन घ्यायला आलेल्या प्रत्येकाला रांगेतूनच सोडण्यात येत होते. मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बरीच गर्दी झाल्याने पोलीस गर्दी आणि वाहने यांना आळीपाळीने सोडत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ आणि ‘जय भीम’ या घोषणा सर्वत्र ऐकू येत होत्या. पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या कपडय़ांमध्ये आलेल्या आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर चैत्यभूमीकडे जाण्यासाठीचा उत्साह दिसत होता. लाल रंगाचे ‘चिवर’ वस्त्र धारण केलेल्या ‘बौद्ध बंथीजीं’नी एकत्र येऊन बौद्ध श्लोकांचे पठण केले.

स्मारकाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर सर्व बांधवांसाठी आणि पोलिसांसाठी ‘भारतीय बौद्ध महासभा’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणानंतर अनेकांनी दादर चौपाटी गाठून भर उन्हातच विश्रांती घेतली. भारतीय संविधान आणि इतर दलित साहित्य या वेळी विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. बाबासाहेबांच्या कृष्णधवल छायाचित्रांनाही बरीच मागणी मिळत होती. परतीच्या वाटेवर महानगरपालिकेतर्फे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एका स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘व्यसनविषयक जागरूकता आणि व्यसनापासून मुक्ती’ यासाठी स्टॉल उभारण्यात आला होता. येथे येणाऱ्या लोकांना त्यांच्या जवळच्या व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता शोधून दिला जात होता.