मुंबई : अंधेरी येथे चालणारा वेश्याव्यवसाय मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने उद्ध्वस्त केला. याप्रकरणी एका रशियन मुलीसह नालासोपारा भागातील मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. ही मुलगी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी म्हणून मुंबईत आली होती. या मुलींना वेश्याव्यवसायाला लावणाऱ्या दलाल महिलेला सोनी ऊर्फ प्रभा मंडी (३६) हिला पोलिसांनी अटक केली आहे. सोनी विलेपार्ले येथील नेहरूनगर भागात राहते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सोनी ग्राहकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून मुलींचे फोटो पाठवत असे. ग्राहकांनी मुलींची पसंती दर्शविल्यावर ती त्या ग्राहकांना हॉटेलची खोली भाडय़ाने घेण्यास सांगत असे. अंधेरी परिसरात सोनी अशाप्रकारे वेश्याव्यवसाय चालवते, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सोनी हिच्याशी संपर्क साधला. तिने पोलिसांना ग्राहक समजून व्हॉटसअपच्या माध्यमातून मुलींचे फोटो पाठविले. या बनावट ग्राहकाने त्यातील एका रशियन मुलीची आणि भारतीय मुलीची मागणी सोनीकडे केली. तिने या ग्राहकाला मरोळ मेट्रो स्टेशनजवळील हॉटेल सहार गार्डन येथे खोली भाडय़ाने घेण्यास सांगितले. त्यानुसार या बनावट ग्राहकाने खोली घेतली. पोलिसांनी या हॉटेल परिसरात सापळा रचला. सोनी या पीडित महिलांसह हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले, तसेच पीडित मुलींची सुटका केली. ही कारवाई समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी आठवडाभरात वेश्याव्यवसायाच्या रॅकेटवर केलेली ही चौथी कारवाई आहे. याप्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. तर चित्रपट आणि मालिकांमध्ये कामाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायाला भाग पाडलेल्या १७ पीडित मुलींची सुटका केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.