कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आल्यानंतर ते चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. दादरच्या कृष्णकुंज या निवासस्थानावरुन राज हे सहकुटुंब ईडीच्या कार्यलयात साडे अकराच्या सुमारास दाखल झाले आहेत. राज हे सहकुटुंब चौकशीसाठी गेल्याच्या मुद्द्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे चौकशीला चाललेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असा सवाल दमानिया यांनी ट्विटवरुन विचारला आहे.

राज ठाकरे यांची चौकशी २२ तारखेला म्हणजेच आज होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाल्यानंतर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर राज यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळपासूनच मुंबईमधील अनेक महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तामध्ये राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि बहीण यांच्या सोबत पावणे अकराच्या सुमारास कृष्णकुंजवरुन ईडीच्या कार्यलयाच्या दिशेने रवाना झाले. सर्वच प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त चालवण्यानंतर राज हे सहकुटुंब चौकशीला का जात आहे यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु झाली. दमानिया यांनाही ट्विट करुन यासंदर्भात प्रश्न उपस्थित करता राज यांनी सहकुटुंब चौकशीला जाणे हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टिका केली आहे. “राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडी च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न (आहे.)” असं ट्विट दमानिया यांनी केलं आहे.

तसेच एका वृत्तवाहिनीकडे व्यक्त केलेल्या मतामध्ये दमानिया यांनी, ‘राज यांनी एकट्याने चौकशीला जाऊन परत यायला हवं होतं. पत्नी, मुलगा, बहीण, सून यांना घेऊन चौकशीला जाण्याची गरज नव्हती. राज ठाकरे स्वत:ला निर्दोष मानतात तर त्यांना एवढ्या लोकांना घेऊन जाण्याची गरजच नव्हती. हे असं करणे अती असल्याचं मला वाटतं,’ असं सांगितलं दरम्यान, राज हे साडेअकराला ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. जवळजवळ सात तास राज यांची चौकशी होणार असल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.