महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना अभिनयाचे वेड जपायचे, वाढवायचे म्हणून एकांकिका स्पर्धामध्ये हिरीरीने सहभागी होणारे अनेकजण असतात. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पहिल्याच पर्वात असे उत्साही तरुण नाटय़वेडे सहभागी झाले होते. मात्र रंगभूमीवर आपली एकांकिका तडफेने सादर करताना कधीतरी हाच क्षण आपल्याला चित्रपटापर्यंत पोहोचवेल, असे त्यांच्या स्वप्नातही आले नसेल. पुण्यात प्राथमिक फेरीत ‘चिठ्ठी’ करताना ते अनुजा मुळ्येलाही जाणवले नव्हते. त्याचवेळी तिची निवड राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केली आणि आज हीच अनुजा ‘सैराट’मधील आर्चीची मैत्रीण ‘आनी’ म्हणून लोकप्रिय झाली आहे!
‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा वेगळी ठरते ती याच कारणासाठी! ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत, ‘केसरी’ आणि ‘झी युवा’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे तिसरे पर्व २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. राज्यभरातील आठ शहरे, तेथील नाटय़गुणांचा अविष्कार करता यावा म्हणून या स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असतानाच त्यातील उत्तम कलाकार नाटय़-चित्रपट-मालिकेतील पारख्या नजरेतून सुटणार नाहीत, याचीही काळजी घेणारी ही एकमेव अशी स्पर्धा आहे. म्हणूनच पहिल्या वर्षांपासून आता याहीवर्षी टॅलेंट पार्टनर या नात्याने ‘आयरिस प्रॉडक्शन’ स्पर्धेशी अजूनही जोडलेले आहेत. ‘लोकांकिका’च्या पहिल्याच पर्वापासून रंगमंचीय अविष्कार करणाऱ्या अनेक गुणी स्पर्धकांना अभिनयाच्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हेरले आणि त्यांना या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या दृष्टीने पुढची कवाडे उघडून दिली. पुण्याच्या ‘आयएलएस लॉ’ महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुजाने ‘लोकांकिका’ स्पर्धेत ‘चिठ्ठी’ या एकांकिकेत काम केले होते. पुण्यात प्राथमिक फेरीत ही एकांकिका सादर होत असतानाच तिथे परीक्षक म्हणून बसलेल्या नागराज मंजुळे यांनी अनुजाला ‘सैराट’च्या ऑडिशनसाठी बोलावले. तिची ऑडिशन यशस्वी ठरली आणि आज आनीच्या भूमिकेतील अनुजा मुळ्येला लोकही ओळखू लागले आहेत.
अनुजासारखे असे अनेक स्पर्धक ‘लोकांकिका’च्या माध्यमातून मालिका आणि चित्रपटांत कार्यरत झाले आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात पुढची वाटचाल करण्याची अशीच सुवर्णसंधी पुन्हा एकदा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्याच व्यासपीठावर तुमची वाट पाहते आहे. ही संधी घेण्यासाठी indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2016 या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले प्रवेश अर्ज लवकरात लवकर भरायचे आहेत. या स्पर्धेशी ‘झी युवा’ या तरुणाईशी नाते सांगणाऱ्या नव्या वाहिनीचे नावही जोडले गेले असून ‘लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीचे प्रसारण या वाहिनीवरून करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे यांच्यासह रत्नागिरी, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर अशा आठ केंद्रांवरची प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी पार पडल्यानंतर या स्पध्रेची महाअंतिम फेरी यंदा १७ डिसेंबर रोजी पार पडेल.
- प्राथमिक फेरी : २६ नोव्हेंबरपासून
- केंद्र : मुंबई, पुणे, ठाणे यांच्यासह रत्नागिरी, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर
- महाअंतिम फेरी : १७ डिसेंबर