दररोज गावात दूध गोळा करून ते तालुक्याच्या ठिकाणी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारा दूध व्यावसायिक ते एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल पाच वेळा नेवासा- राहुरीचा आमदार हा भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा प्रवास. या प्रवासात एक शिवसेना वगळली तर सगळ्याच राजकीय पक्षांचा झेंडा त्यांनी मिरवला. हेतू साध्य होताच ते झेंडे पायदळी फेकूनही दिले. त्यांच्या या राजकारणाला मुलामा होता समाजकारणाचा. प्रत्यक्षात दहशतीच्या जोरावर नगर जिल्ह्य़ात निर्माण केलेले साम्राज्य हाच त्यांच्या सत्तेचा पाया असल्याचे सांगण्यात येते.
बोऱ्हानगर हे नगरपासून काही अंतरावर असलेले गाव. तेथून कर्डिले यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला. बाणेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी तेथे सार्वजनिक जीवनास सुरुवात केली. गावचे सरपंचही झाले ते. काही काळातच त्यांना आमदार होण्याची आयती संधी चालून आली ती काँग्रेसच्या जिल्हांतर्गत बंडाळीतून. काँग्रेसचे दादा पाटील शेळके हे खासदार झाल्यानंतर काँग्रेसने विजया कुटे यांना उमेदवारी दिली. स्थानिक नेत्यांना कुटे यांची उमेदवारी मान्य नव्हती. तेव्हा त्यांनीच कर्डिले यांना अपक्ष म्हणून पुढे केले आणि आमदारही केले. याच दरम्यान नगर भागातील जमिनीचे भाव वधारले होते. बांधकाम व्यवसायही तेजीत होता. या भागातील राजकीय जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्डिले यांनी चातुर्याने या परिस्थितीचा फायदा घेतला. तालुक्यात पद्धतशीरपणे आपले बस्तान बसविले. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यांच्या माध्यमातून पाहता पाहता कर्डिले नावाचे प्रस्थ नगर जिल्ह्य़ात उदयास आले.
थोरात आणि विखे पाटील ही जिल्ह्य़ाच्या राजकारणातील मातब्बर घराणी. त्यांचे राजकीय वैर. त्यांच्यातील भांडणाचा लाभ उठवत कर्डिले यांनी तालुक्यातील तथाकथित नेते, गुंड यांना ‘आशीर्वाद’ देत आपलेसे केले आणि दहशतीच्या जोरावर नगर जिल्ह्य़ाच्या राजकीय सारीपाटावर नवीन घराणे निर्माण केले. याबाबत उघडणे कोणीही बोलत नाही, मात्र अपक्ष- काँग्रेस- राष्ट्रवादी- भाजप असा राजकीय प्रवास करीत पाच वेळा आमदार झालेल्या कर्डिले यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत खुनापासून ते पाणी चोरी, मतदारांना पैसे वाटपापर्यंत दाखल असलेले सुमारे दीड डझन गुन्हे कर्डिले यांचे दहशतीचे राजकारणच अधोरेखित करतात. त्यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, एका महिला मतदाराला रोखून मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी कर्डिले यांना न्यायालयाने एक वर्षांच्या कैदेची शिक्षाही ठोठावली आहे. मात्र त्याविरोधात त्यांनी अपील केले आहे. अशोक लांडे या लॉटरी विक्रेत्याच्या हत्या प्रकरणातही त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून हेही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच निवडणुकीत याच कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.