मिलिंद मानकर, नागपूर
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या थोर महापुरुषांची अतिशय बोधप्रद प्रेरणादायी चरित्रे लिहून आधुनिक चरित्रलेखकात मानाचे स्थान पटकविणारे प्रसिद्ध चरित्रकार धनंजय कीर यांची आज १०५ वी जयंती त्यानिमित्ताने…
भारत देश अनेक संत-महात्म्यांची, महापुरुषांची जन्मभूमी-कर्मभूमी आहे. थोर विचारवंत, समाजप्रवर्तक, राष्ट्रनिर्मात्यांची मांदियाळी या पवित्र पावन देशाचे चिरंतन भूषण आहे. त्यांच्या यशोगाथा दीपस्तंभाप्रमाणे सदैव तेवत राहाव्यात या उदात्त हेतूने अनेक प्रतिभावंत लेखकांनी त्यांची जीवनगाथा चरित्ररूपाने शब्दांकित केली आहे. ही चरित्रे म्हणजे भावी पिढीला नवी दिशा देणारा, प्रेरणा देणारा, प्रोत्साहित करणारा अनमोल ठेवा आहे. अशा प्रतिभावंत शब्दप्रभू लेखकांच्या नामावलीत प्रसिद्ध लेखक धनंजय कीर यांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो.
धनंजय कीर यांचा जन्म रत्नागिरीत १९१३ साली झाला. नोकरीच्या शोधात ते मुंबईला आले. मुंबईवासी झाले. मात्र जन्मभूमीचा त्यांना विसर पडला नाही. पटवर्धन आणि मांद्रेकर गुरुजींनी त्यांना इंग्रजी भाषेची गोडी लावली. इंग्रजीचे समृद्ध ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी दादरच्या ‘फ्री रिडिंग रूम’ला वाहून घेतले होते. आज ‘काशीनाथ धुरू हॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेतील ग्रंथांचे त्यांनी अधाशासारखे वाचन केले होते. त्यामुळे त्यांना आजूबाजूचे लोक ‘वेडा जॉन्सन’ म्हणायचे.
चरित्रे लिखाणाची हातोटी कीरांनी आत्मसात केली. अभ्यासू अन् प्रगल्भ लेखणीने महापुरुषांच्या चरित्राला नवा आयाम मिळवून दिला. ‘एका व्यक्तीचे चरित्र म्हणजे त्याआधी सुमारे ७०० ते ८०० पुस्तकांचा अभ्यास’ असे ते एका मुलाखतीत म्हणाले होते. ‘उत्तम चरित्रलेखक कसा असावा’ हे जाणून घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी साहित्यातील अनेक ग्रंथांचा शोध घेतला. त्याचीच परिणती म्हणजे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर या उत्तुंग भारतपुत्रांची चरित्रे होत.
लोकोत्तर आयुष्याचा प्रचंड पसारा ग्रंथरूपाने साकार करण्यासाठी लागणारी सम्यक दृष्टी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. चरित्रलेखन जीवनाचे ध्येय ठरविल्यावर आवश्यक त्या व्यासंगाची जोपासना त्यांनी आयुष्यभर केली. खऱ्या ज्ञानवंतांच्या भूमिकेत ते कायम राहिले. माहीमला त्यांच्या राहत्या घरी दुर्मिळ अफाट पुस्तकालय होते. कपाटातली जागा अपुरी पडली तेव्हा घराच्या खुंटीला पुस्तकांची गाठोडी लटकू लागली. सतत वाचनामुळे त्यांच्या चष्म्याची जाडी वाढत गेली. लेखनाच्या छंदामुळे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक लेखक, संपादक, बुद्धिवादी, नेते त्यांच्या संपर्कात आले. त्यांचे जीवन जवळून बघितले. अभ्यासले आणि अव्याहत लेखन करीत राहिले. ही जी साधना त्यांनी केली ती अर्थाजर्नासाठी नव्हे, धनवान होण्यासाठी नव्हे तर ज्ञानसंपदेतून थोर पुरुषांच्या प्रती आपला कृतार्थ भाव व्यक्त करण्यासाठी होती.
योगायोगाने कीरांना बाबासाहेबांचा सहवास लाभला. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कर्तृत्वाचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्याच प्रेरणेने त्यांनी बाबासाहेबांचे चरित्र लिहिले. हाताचे ठसे घेण्याच्या निमित्ताने १९३६ साली बाबासाहेबांची भेट घेतली. बाबासाहेबांबद्दल काही भाकीतेही केली. बाबासाहेबांवर पहिला चरित्रग्रंथ इंग्रजीतून ‘डॉ. आंबेडकर लाईफ ऍण्ड मिशन’ नावाने १९५४ साली लिहिला आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ नावाने मराठी चरित्र १४ एप्रिल १९६६ रोजी प्रकाशित केले. बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात २३ ते २५ मार्च १८७२ रोजी कीरांनी तीन व्याख्याने दिली. ती व्याख्याने ‘विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानस आणि तत्त्वविचार’ नावाने प्रसिद्ध आहेत. तेव्हापासूनच धनंजय कीर खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट चरित्रकार, लेखक म्हणून पुढे आले.
चरित्रकार धनंजय कीरांचे सासरे भिकाजी तात्या कनगुटकर अतिशय श्रीमंत होते. मुंबईतही त्यांच्या चाळी होत्या. ते इतके श्रीमंत होते की आपल्या गावाला जाण्यासाठी त्यांनी एकदा चक्क विमान केले होते. पत्नीच्या माहेरची ही श्रीमंती असतानाही त्यांनी आपला स्थायीभाव कधी सोडला नाही. माहीमच्या छोटय़ा घरातच राहून त्यांनी ज्ञानाची अखंड ज्योत तेवत ठेवली. ते महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात शिस्तप्रिय ‘शाळा तपासनीस’ म्हणून परिचित होते. दादर परिसरात मुलींसाठी एक रात्रशाळाही त्यांनी सुरू केली होती. कीर हे अतिशय सौजन्यशील, प्रामाणिक, जिज्ञासू गृहस्थ होते असे त्यांचे समकालीन लोक आजही मोठय़ा अभिमानाने सांगतात. महापुरुषांचे गुण आपल्या अंगी उतरवण्याचे प्रामाणिक प्रयत्न त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केले. अशा या थोर बुद्धिवादी, व्यासंगी चरित्रकाराला १०५ व्या जयंतीदिनानिमित्ताने अभिवादन.