अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. पण अजूनही भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांना बाबरी मशीद पाडल्याच्या खटल्यात आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहावे लागत असल्याबद्दल खंत व्यक्त करत बाबरीचा खटला राम मंदिराच्या भूमिपूजनाआधीच रद्द केला तर राम मंदिर आंदोलनातील शहिदांना ती मानवंदना ठरेल, अशी भूमिका शिवसेनेने आपल्या मुखपत्रामधून मांडली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या मुखपत्रात रामायण या शीर्षकाच्या संपादकीय लिखाणातून राम मंदिर आंदोलनावर भाष्य करण्यात आले आहे. ‘‘उझबेकिस्तानमधून आलेल्या बाबराच्या नावाने अयोध्येत राम मंदिर पाडून मशीद उभी राहिली. तेथे पुन्हा मंदिर व्हावे असे जनमत होते. बाबराच्या नावाने केलेले अतिक्रमण लाखो कारसेवकांनी उद्ध्वस्त केले. त्यात शिवसेनाही होती. बाबरी तोडून जेथे राम मंदिराची पायाभरणी होत आहे, त्या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. पण बाबरी पाडल्याच्या कटाचा खटला आजही लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेकांवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत निकाल दिल्यानंतरही बाबरी विध्वंसाचा खटला सीबीआय चालवते व त्यासाठी अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते अडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात हा कायद्याचा कसला खेळ मानावा. बाबरी पाडल्याच्या

कटाचा खटलाच राममंदिर भूमिपूजनाआधी निकालात निघाला तर आंदोलनात शहीद झालेल्यांना ती मानवंदना ठरेल’’, अशी भूमिका शिवसेनेच्या मुखपत्रातून मांडण्यात आली आहे.

बाबर हा आक्रमक होता हे एकदा स्वीकारल्यावर बाबरी विध्वंसाचा कट रचला हा खटलाच गतप्राण होतो, असेही यात नमूद केले आहे.

भाजपला चिमटा..

अयोध्या रामाचीच मंदिर तेथेच होईल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून देणाऱ्या रंजन गोगोई यांनाही भूमिपूजन सोहळ्यातील निमंत्रितांमध्ये मानाचे पान मिळावे, अशी अपेक्षाही शिवसेनेच्या मुखपत्रातील संपादकीय लेखात व्यक्त करण्यात आली आहे. राम मंदिरासाठी रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी रामाप्रमाणेच वनवासात गेले, असा चिमटाही भाजपला काढण्यात आला आहे. ५ ऑगस्टला भूमिपूजन होईल. मंदिराच्या कळसाचा मुहूर्तही शोधलाच असेल. रामायणास अंत नाही ते सुरूच असते, असे सूचक भाष्यही यात करण्यात आले आहे.

Story img Loader