सत्तेत राहूनही मित्रपक्ष भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेला भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुक्रवारी कडवे उत्तर दिले. ‘भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया’ या फेसबुक अकाऊंटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध पोस्टर्समधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांचा पाणउतारा करण्यात आला आहे. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल, दिग्विजय सिंह, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एकाच माळेचे मणी असल्याची टीकाही करण्यात आली आहे. भाजपने पोस्टरच्या माध्यमातून केलेला प्रतिहल्ला शिवसेनेच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये बोलताना संजय राऊत यांनी आमचा लढा निजामाच्या बापाशी असल्याचे सांगत भाजपवर हल्ला चढवला होता. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर बुडबुडे फुटायला लागले आहेत. महाराष्ट्रात बुडबुडे टिकत नाही. फक्त लाट टिकते आणि लाट शिवसेनेची आहे, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतरच ही पोस्टर्स फेसुबकवरील सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसिद्ध झाली आहेत. वेगवेगळ्या पोस्टर्सच्या माध्यमातून शिवसेनेला फटकारण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणाच्या छायाचित्रवर दोन वाक्ये लिहिण्यात आली आहेत. त्यामध्ये ‘वाघाचं कातडं पांघरून टीका करणं हे शिवसेनेचं काम आहे. जगभर भारताचा दरारा ठेवणं हे वाघाच्या काळजाचं काम आहे’ असे वाक्य लिहिण्यात आले आहे. देशासाठी आजवर कसलेच योगदान न देणारे संकटांचा काय सामना करणार? देशाचे नाव जगभर उंचावणाऱ्या मा. पंतप्रधानांवर हे टीका करतात. हीच का मातोश्रीची शिकवण? असा प्रश्न एका पोस्टरमधून विचारण्यात आला आहे.
शिवसेना आपले मुखपत्र सामनामधून सातत्याने नरेंद्र मोदी, केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार यांच्यावर टीका करते. त्यालाही या पोस्टरमधून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
