करोनाचा मुकाबला करत असलेल्या मुंबईसमोर पावसानंही नवं संकटं उभं केलं आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार कायम असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं असून, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजपानं शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेला धारेवर धरलं आहे. शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेला सवाल केले आहेत. त्याचबरोबर टक्केवारी लाटल्याचा गंभीर आरोपही केला आहे. “नालेसफाईचा दावा ११३% चा केला. आता नगरसेवक निधीवर ७३% डल्ला मारला. मुंबईकरांना काय मिळालं? गोरगरिबांच्या घरात पाणी शिरलेच. मुंबईची तुंबई झालीच. रस्त्यांवर खड्डे पडलेच. मग हे टक्के कुठे गेले? मुंबईकर कोविडशी लढत असताना, पालिकेत सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीचे घोडे चौखूर उधळत आहेत,” अशी टीका शेलार यांनी केली.

आणखी वाचा- करोनाची ‘ती’ कॉलर ट्यून आता बंद करा, कारण…; मनसे नेत्याची मागणी

“महापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचे कंत्राट. शिवसेनेच्या नगरसेवकांना ५३५.९५ कोटींचा निधी. वा!
मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची “प्रिपेड” समाजसेवा जोरात! इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत!,” असा गंभीर आरोपही शेलार यांनी शिवसेनेवर केला आहे.

आणखी वाचा- “फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्रानं पाहिली”

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे अनेक भागांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये पाणी साचल्याचं समोर आलं. यावरून शेलार यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी नालेसफाई संदर्भात केलेल्या विधानाचाही हवाला दिला आहे.