केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी तात्काळ स्मारकाच्या ठिकाणी पोहोचून शुद्धीकरण केलं. यानंतर आता शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

“अशुद्ध आणि शुद्ध असा भेदभाव करणारी मनस्थिती प्रबोधनकार ठाकरेंना मानणाऱ्या पक्षाची आहे. ही विदारक स्थिती महाराष्ट्राच्या संस्कृतीची झाली आहे. ती जागा काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नाही. ती मुंबई महानगरपालिकेची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जागी कुणी जायचं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शुद्धीकरण करायचं असेल तर शिवसेनेचं करावं लागेल. विश्वासघाताने सोनिया गांधींसोबत सत्तेत जायचं आणि सोनिया गांधींची शपथ आदित्य ठाकरे यांनी घ्यायची. याचं शुद्धीकरण बाळासाहेबांच्या नावाने करावं लागेल. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं. त्या छगन भुजबळांसोबत सत्ता स्थापनेसाठी बसायचं. स्वत:च्या वडिलांच्या विचारांना आणि प्रेरणेला बगल देऊन केलं आहे. या शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. शुद्धीकरणाच्या नावाने नौटंकी करू नये” अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी केली.

“….तोपर्यंत ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाही”; अनिल देशमुखांनी अखेर सोडलं मौन

“बाळासाहेबांनीच मला घडवलं”

यावेळी बोलताना नारायण राणेंनी बाळासाहेबांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी एवढंच सांगितलं की साहेब, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला हवे होते. मला बाळासाहेबांनीच घडवलेलं आहे, दिलेलं आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव, माझा आशीर्वाद आहेत. असं म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला, तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत असं मला वाटतं”, असं राणे म्हणाले.