विधानसभेसाठी शिवसेनेला १४० पर्यंत जागा देण्याचा प्रस्ताव

स्वबळावर लढण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची भाजप नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने युती म्हणून एकत्रित लढवावी, असा दबाव भाजप नेतृत्त्वाकडून आणला जात आहे. त्यादृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १४० पर्यंत जागा देण्याची तयारी भाजप नेतृत्त्वाने दर्शविली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. भाजपच्या या प्रस्तावावर ‘मातोश्री’ कोणती भूमिका घेते, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या एका खासदाराला नवी दिल्लीत चर्चेसाठी पाचारण केले होते. त्यावेळी, कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत राहावे, असा प्रस्ताव सादर केला गेल्याचे समजते. शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास पाच ते सहापेक्षा जास्त जागा निवडून येणार नाहीत, असे शहा यांनी या खासदाराच्या निदर्शनास आणून दिले. शिवसेनेच्या दृष्टीने लोकसभेपेक्षा राज्य विधानसभा महत्त्वाची आहे. त्यातूनच लोकसभेत एकत्रित लढल्यास विधानसभेसाठी १४० पर्यंत जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांनी सध्या आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेले महाराष्ट्र हे राज्य भाजपसाठी अधिकच महत्त्वाचे आहे. त्यातच राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

या साऱ्या पाश्र्वभूमीवर भाजपने शिवसेनेशी चर्चेची दारे खुली केल्याचे सांगण्यात येते. अमित शहा यांच्या प्रस्तावावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या काही निवडक नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते.

शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न

भाजप आणि शिवसेनेतील वाढती कटुता, त्यातच शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा इशारा दिल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न अलिकडे केला आहे. राज्यातील सुमारे पाच हजार ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारती नाहीत. अशा ग्रामपंचायतींच्या नव्याने इमारती बांधण्यात येणार असून, या योजनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. गावोगावी बाळासाहेबांचे नाव पोहोचल्याने त्याचा राजकीय फायदा शिवसेनेलाच होईल, असा भाजपमधील काही नेत्यांचा आक्षेप आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या दादरमधील रखडलेल्या स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत स्मारकाचे आराखडे तात्काळ सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पर्यावरणविषयक मंजुरी लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक गेले तीन वर्षे रखडल्याने शिवसेनेने नाराजीची भावना आहे. शिवसेनेने स्वबळाचा इशारा दिल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याने त्यास वेगळा संदर्भ असल्याची चर्चा सुरू झाली होती.