लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरासमोरुन मुंबई पोलिसांनी भाजपाच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते प्रसाद लाड या नेत्यांबरोबरच अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. राज्यभरामध्ये आज भाजपाने मंदिरांसमोर आंदोलन केलं असून मंदिरं उघडण्यात यावीत अशी मागणी केली. काहीही झालं तरी आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करणार अशी भूमिका प्रविण दरेकर यांनी घेतली. अनेकदा सांगूनही कार्यकर्त्यांची गर्दी वाढत असल्याने अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं समजते. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे बंद असून ही मंदिरे उघडण्यात यावीत यासाठी भाजपाने आज राज्यव्यापी आंदोलन केलं आहे.

आज दुपारी बाराच्या सुमारास प्रविण दरेकर आणि भाजपाचे कार्यकर्ते सिद्धीविनायक मंदिराजवळ पोहचले. या सर्वांनी मंदिरामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना मंदिरामध्ये प्रवेश करुन दिला नाही.  “सरकारने आम्हाला मंदिरामध्ये शिरण्याची परवानगी दिली नाही तरी आम्ही प्रवेश करणार आणि परमेश्वराला सांगणार की या करोनाला पळवून लावं असं सांगणार,” अशी प्रतिक्रिया यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी दिली.

आणखी वाचा- भाजपाच्या मंदिर आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पोलिसांची दडपशाही सुरु असून आम्ही आज मंदिरामध्ये प्रवेश करणारच असं प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. तर भाजपाच्या काही कर्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निषेध करण्यासाठी येथे आलो आहोत असं सांगितलं. काही कार्यकर्त्यांनी आम्ही हिंदुत्वासाठी मंदिरामध्ये आज प्रवेश करणारच असं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंशी बोलताना स्पष्ट केलं. यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये ‘अधर्मी सरकार मंदिर खोलो’, ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’ असे फलक होते.

आणखी वाचा- साईमंदिर सुरु करा ही मागणी करत शिर्डीतही भाजपाचं आंदोलन

मुंबईबरोबरच नागपुरातही मंदिर उघडण्यासाठी भाजपचं आंदोलन सुरु केलं आहे. मंदिराबाहेर प्रतिकात्मक आरती करुन टाळ वाजवून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याची मागणी केली आहे. याचबरोबर शिर्डीतील साई मंदिर, साई मंदिर वर्धा-नागपूर मार्ग येथेही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन मंदिरं खुली कऱण्याची मागणी केली.

आणखी वाचा- बार सुरू झाले, देव कुलुपबंद का?; राज्यपाल कोश्यारींचा ठाकरे सरकारला सवाल

१६ मार्चपासून बंद आहे सिद्धीविनायक मंदिर

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर १६ मार्चपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. करोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं होतं. मंदिर बंद असताना नित्याचे धार्मिक विधी पूजाऱ्यांमार्फत केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. न्यासाचे प्रमुख आदेश बांदकेर यांनी ही महिती दिली होती.