संदीप आचार्य 
मुंबई: खासगी प्रयोगशाळांनी कोणत्याही परिस्थितीत त्याच दिवशी करोना चाचणीचे अहवाल दिले पाहिजे अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच हा अहवाल सर्वप्रथम पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये दाखल केला पाहिजे असा फतवा महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी काढला असून याचे तीव्र पडसाद रुग्ण, खासगी प्रयोशाळांचे चालक तसेच राजकीय वर्तुळात उमटले आहेत.

खासगी प्रयोग शाळांकडून वेळेत करोना चाचणीचा अहवाल मिळणे हे मुंबईतील करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता अत्यावश्यक बाब आहे. तसेच हे अहवाल महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे जमा झाल्यास रुग्णाला संपर्क करणे तसेच त्याच्या संपर्कातील लोकांना शोधून तातडीने क्वारंटाइन करणे शक्य होईल हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. मात्र यात अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लगत असून त्याची दखल न घेता पालिका अधिकारी आयुक्तांच्या आदेशाचा गैरफायदा घेतील अशी भीती काही खासगी करोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा चालकांनी व्यक्त केली आहे. आमच्याकडे काहीवेळा अचानक कर्मचारी येत नाहीत तर बरेचवेळा अस्वस्थ असलेल्या रुग्णांचा तातडीने अहवाल मिळण्यासाठी दबाव येतो.  चाचणीचे पैसे रुग्ण देणार असल्याने नैतिकदृष्ट्या त्याला अहवाल देणे बंधनकारक आहे. शिवाय अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधीकडून तात्काळ आहवाल देण्यासाठी दबाव येत असतो. अनेक गोष्टींचा सामना आम्हाला करावा लागत असून आता आयुक्तांच्या आदेशामुळे पालिकेचे अधिकारीही छळवणूक करतील अशी भीती या प्रयोगशाळा केंद्र चालकांना सतावायला लागली आहे तर आयुक्त चहेल यांनी पालिका विभाग कार्यालयात तातडीने अहवाल देणे बंधनकारक केले असले तरी आम्हाला त्यानंतर किती वेळात उपचार मिळणार याची मुदत पालिका अधिकाऱ्यांना का घातली नाही, असा सवाल सुश्रुत पाटणकर या नागरिकाने उपस्थित केला आहे.

अहवाल मिळाल्यापासून किती वेळात पालिका अधिकारी करोना रुग्णाला त्याची माहिती काळवतील तसेच किती वेळात रुग्णाला क्वारंटाइन केले जाईल व योग्य उपचार मिळतील याचे वेळापत्रक आयुक्त चहेल देतील का, असा सवाल सुश्रुत पाटणकर यांनी केला आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. “एखाद्या रुग्णाने १९१६ वर दूरध्वनी केल्यानंतर रुग्णासाठी किती वेळात रुग्णवाहिका मिळणार, मृत पावलेल्या व्यक्तीला किती वेळात स्मशानभूमीत नेणार व किती वेळात अंत्यसंस्कार होणार तसेच मृत्यू प्रमाणपत्र किती दिवसात देणार?” असे सवाल आशिष शेलार यांनी केले आहेत. “शेकडो रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही, रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णालयांमध्ये फिरून रुग्णांचे मृत्यू होतो असल्याच्या घटना रोज वर्तमानपत्रात वाचायला मिळतात ही परिस्थिती आयुक्त चहेल कधी बदलणार असा सवाल करून महापालिकेत करोना चाचणी अहवाल जमा केल्यास रुग्णाला त्याची माहिती व उपचार तातडीने मिळेल याची हमी आयुक्त देणार का?” असा मुद्दा शेलार यांनी उपस्थित केला. स्मशानभूमीत पुरेसे कर्मचारी नाहीत आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तासनतास थांबावे लागत आहे. हे कमी म्हणून आता रुग्णाचा चाचणी अहवाल प्रथम पालिकेला गेल्यास तो रुग्णाला देण्यासाठी भ्रष्टाचार होऊ शकतो, अशी भीतीही शेलार यांनी व्यक्त केली.

“महापालिकेकडे आज पुरेसे कर्मचारी नाहीत की डॉक्टर, अशावेळी खासगी  प्रयोगशाळेतून अहवाल प्रथम विभाग कार्यालयाला कळवणे म्हणजे रुग्णाच्या जीवाशी खेळ आहे” अशी भीती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली. “लोकप्रतिनिधींचे रुग्णोपचाराच्या विनंतीचे फोनही उचलायला पालिका अधिकाऱ्यांकडे वेळ नाही ते रुग्णांना चाचणी अहवाल कळवणार कधी आणि त्यांना रुग्णालयात दाखल करणार कधी?” असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला. “महापालिका मोठ्या प्रमाणात तात्पुरती रुग्णालये सुरु करून तेथे हजारो खाटांची व्यवस्था करत आहे. जूनपर्यंत एक लाख तर १५ जूनपर्यंत दीड लाख खाटा उभ्या करण्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे. यासाठी डॉक्टर, परिचारिका तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी आणणार व कधी आणणार याचे वेळापत्रकही आयुक्तांनी जाहीर करावे”, असे आवाहन संदीप देशपांडे यांनी केले. “आज केईएम, शीव व नायर रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी अत्यंत कमी आहेत. गेले दोन महिने निवासी डॉक्टर जीवाची बाजी लावून किल्ला लढवत आहेत. अशावेळी डॅशबोर्डवर नोंद करणार की रुग्णांवर उपचार करणार”, असा सवाल देशपांडे यांनी केला. “महापालिका मोठ्या प्रमाणात तात्पुरती रुग्णालये उभारत आहे तेथे डॉक्टर व परिचारिकांची व अन्य कर्मचार्यांची व्यवस्था कशी व कधी करणार?” असा सवाल करून देशपांडे म्हणाले, रुग्णांसाठी पुरेशा रुग्णवाहिका पालिका उभ्या करू शकत नाही. हे कमी म्हणून की काय रुग्णांना खाटा मिळत नसल्याने अनेक रुग्णालयांच्या चकरा मारत फिरावे लागत आहे. त्याचे व्यवस्थापन पालिकेने आधी केले पाहिजे. मुंबई आज धोक्याच्या उंबरठ्यावर उभी आहे आता योग्य नियोजन केले नाही तर परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल असेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Story img Loader