मात्र महापौरांनी पालिका सभागृहात घोषणा टाळली
मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ सभागृह नेते यशवंत जाधव यांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यामुळे रिक्त सभागृह नेतेपदासाठी तीन माजी महापौरांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. अखेर माजी महापौर विशाखा राऊत यांनी या स्पर्धेत बाजी मारली आणि ‘मातोश्री’ने सभागृह नेतेपदाची धुरा विशाखा राऊत यांच्याकडे सोपविली. मात्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृहाच्या बुधवारच्या बैठकीत सभागृह नेतेपदी राऊत यांच्या नावाची घोषणा करणे टाळले आणि दालनात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली.
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने सभागृह नेते यशवंत जाधव यांना उमेदवारी दिली असून भाजप आणि विरोधकांनी उमेदवार उभा न केल्यामुळे यशवंत जाधव यांचा विजय निश्चित झाला आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर सभागृह नेतेपद रिक्त झाले. पालिका सभागृहाची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यात महापौर विश्वनाथ महाडेश्वर सभागृह नेतेपदावर नियुक्ती करण्यात येणाऱ्या व्यक्तीच्या नावाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या बैठकीत घोषणा केलीच नाही. सभागृहाची बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राऊत यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच त्याबाबतचे पत्रही त्यांनी चिटणीस विभागाला पाठविले. मात्र याबाबत विरोधकांमध्येच नव्हे तर शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.
पालिकेच्या १९९२ मध्ये झालेल्या निवडणुकीत विशाखा राऊत पहिल्यांदा विजयी होऊन पालिका सभागृहात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर १९९७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही त्या विजयी झाल्या. पहिल्याच वर्षी शिवसेनेने त्यांना महापौरपदावर विराजमान केले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी शिवसेनेचे उपनेतेपदही भूषविले. तसेच विधानसभा निवडणुकीत दादर मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या. मात्र काही कारणास्तव त्या राजकारणापासून अलिप्त राहिल्या होत्या.
शिवसेनेने भाजपशी फारकत घेत मुंबई पालिकेची फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेली निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवसेनेला राऊत यांचे स्मरण झाले आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले.
महिलांसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग १९१ मधून विशाखा राऊत यांनी निवडणूक लढविली आणि त्या विजयी झाल्या. राऊत विश्वासू नेत्यांपैकी एक असल्यामुळे त्यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडेल असा अंदाज शिवसेनेच्या नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र विशाखा राऊत यांच्याकडे स्थापत्य (शहर) समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
सदस्या म्हणूनच मतदान
स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे. अध्यक्षपदाची उमेदवारी शिवसेनेने विद्यमान सभागृह नेते यशवंत जाधव यांना दिली आहे. सभागृहात बुधवारी नव्या सभागृह नेत्यांची घोषणा झाली असती तर स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सभागृह नेत्या म्हणून विशाखा राऊत बसू शकल्या असत्या. राऊत सध्या स्थायी समिती सदस्य आहेत. त्यामुळे स्थायी समिती सदस्य म्हणूनच त्यांना या निवडणुकीत मतदान करावे लागणार आहे.