राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले असले तरी मुंबई लोकल मात्र अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद आहेत. दरम्यान मुंबई हायकोर्टाने बसमधली गर्दी चालते तर मग लोकलमधील गर्दी का नाही? अशी विचारणा राज्य सरकारला केली आहे. तसंच लशीच्या दोन मात्रा घेतलेले नागरिक, पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा असा सल्लाही दिला आहे. हायकोर्टाने राज्य सरकारला पुढील गुरुवारी यासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.

सामान्य मुंबईकरांसाठी लोकल कधी सुरू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका!

“बस आणि अन्य सार्वजनिक वाहनांतून गर्दीने प्रवास चालू शकतो. मग लोकलमधून का नाही. तिथे संसर्ग होणार नाही का?,” असा प्रश्न करत हायकोर्टाने लसीच्या दोन मात्रा घेतलेले नागरिक आणि पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा असा सल्ला दिला. अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईतील नागरिकांच्या गरजा वेगळ्या आहेत. लोकल प्रवास ही मुख्य गरज आहे असंही यावेळी हायकोर्टाने नमूद केलं.

विशेष म्हणजे यावेळी हायकोर्टाने पत्रकारांना लोकलने प्रवास करण्यावर बंदी असल्याचं माहिती पडल्यावर आश्चर्य व्यक्त केलं. सगळे सुरू केले जात असताना विशिष्ट वर्गाला मज्जाव करणं योग्य नाही असं स्पष्ट मत कोर्टाने मांडलं. हायकोर्टाने सरकारला पुढील गुरुवारी याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्टात नेमकं काय झालं –

लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या प्रकरणासंबंधी हायकोर्टात आज सुनावणी पार पडली. हायकोर्टात वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या अशी सूचना केली होती. यानंतर याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी ठेवली होती. हायकोर्टात यावेळी वकिलांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती देत संध्याकाळपर्यंत आदेश निघेल असं सांगण्यात आलं. फक्त तिकीट नाही तर मासिक पासही दिला जाईल असं यावेळी सांगण्यात आलं.

याचिकाकर्ते मोहन भिडे यांनी लसीकरण झालेल्यांना प्रवास देण्याची मागणी केली असून त्यांच्या वतीने वकील अंलकार क्रिपेकर यांनी बाजू मांडली. यावेळी कोर्टाने इंडियन एक्स्प्रेसमध्ये डॉक्टर शशांक जोशी यांच्या मुलाखतीचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी दोन डोस घेतलेल्यांची तपासणी करणं कठीण काम असल्याचं म्हटलं आहे.

अॅटर्नी जनरलनी यावेळी आपण जर लसीकरण झालेल्या आणि विषाणूच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या संख्येचा विचार केला तरी एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्येचा या दोन्हींमध्ये समावेश होत नाही. विषाणूचा प्रसार कमी झालाय पण या एक तृतीयांश लोकांना धोका कायम आहे असं सांगितलं.

जर ट्रेन सुरु झाल्या तर ही अतीसंवेदनशील लोकसंख्या फार लवकर संक्रमित होऊ शकते अशी भीती अॅटर्नी जनरलनी व्यक्त केली. यावेळी कोर्टाने मग इतर ७० टक्के लोकसंख्येचं काय? त्यांच्यासाठी वेगळे काऊंटर असून शकत नाहीत का ? अशी विचारणा केली. इतर देशांमध्ये स्थानकात प्रवेश करण्यासाठी कार्ड लागतं असं कोर्टाने म्हटलं. सार्वजनिक सेवांसाठी एक कार्ड का असू शकत नाही असंही कोर्टाने विचारलं.

यावेळी वकिलांनी संपूर्ण लोकसंख्येचं लसीकरण होण्यास खूप वेळ लागेल असं सांगत ७० लाख लोक प्रवास करत असल्याची माहिती दिली. कधीतरी आपल्याला सुरुवात करावीच लागेल आणि मग दोन लसी घेतलेल्यांना परवानगी हा योग्य पर्याय असल्याचं म्हटलं.

कोर्टाने यावेळी बसमध्ये प्रवासाची परवानगी आहे का? अशी विचारणा केली असता कोर्टाने लोकल बंद असल्याने तिथे जास्त गर्दी होत असल्याची माहिती दिली. तिथेतर सोशल डिस्टन्सिंगही पाळलं जात नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

दरम्यान यावेळी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलाने पत्रकारांनाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी नसल्याचं सांगितलं असता कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं. आम्हाला वाटतं आहे असंही कोर्टाने म्हटलं.

दरम्यान कोर्टाने यावेळी मुंबईची तुलना नागपूर, नाशिकसोबत करु नका असं सांगितलं. मुंबईच्या वेगळ्या गरजा आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असणारं हे शहर आहे सांगताना कोर्टाने याचिकांच्या माध्यमातून हे मुद्दे उपस्थित का होतात? यासाठी विशेष समिती का नाही? अशी विचारणा केली.

लोकांसाठी प्रवास महत्वाचा असून गरीब लोक त्यासााठी जास्त पैसे खर्च करु शकत नाही. हा लोकांच्या दैनंदिन आय़ुष्याचा भाग आहे. काहीजणांना परवानगी आणि काही जणांना नाही यामागे नेमकं काय लॉजिक आहे असं सांगत हायकोर्टाने सरकारला पुढील गुरुवारी भूमिका मांडण्यास सांगितलं आहे.