प्रसिद्धीची अपेक्षा न करता आपापल्या क्षेत्रात अथकपणे आणि सचोटीने कार्यरत असलेल्या तरुणांच्या कार्याची खरी ओळख समाजाला करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कारां’चे तिसरे पर्व नुकतेच पार पडले. विज्ञान-तंत्रज्ञान, नवउद्योजक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे, कला-मनोरंजनविश्वात आपल्या सर्जनशीलतेने आपले वेगळेपण सिद्ध करणारे अशा नानाविध क्षेत्रांतील २० तरुण तेजांकितांचा सन्मान करणारा हा सोहळा शनिवारी, ३ एप्रिल रोजी ‘एबीपी माझा’ वाहिनीवर दुपारी ४ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय शिस्तीत आणि नेटाने पार पडलेल्या ‘तरुण तेजांकित पुरस्कार सोहळ्या’त माहिती आणि प्रसारण खात्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत लक्षणीय कार्य करणाऱ्या या तरुण प्रतिभावंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या प्रशासकीय कार्यातून गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात कायदा-सुव्यवस्था आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिक्षण पूर्ण झाले नसतानाही गावच्या विकासकार्यात भाग घेणारी महिला ते त्याच गावच्या सरपंच पदापर्यंत पोहोचलेल्या ताई पवार, आपले संशोधन आणि तंत्रज्ञानाचा अचूक मेळ साधत शेतकऱ्यांसाठी नवतंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधिका डॉ. रुपाली सुरासे-कुहिरे, नवउद्यमी रितू मल्होत्रा, ‘स्नोवेल’ या ऑडिओ बुक्सच्या यशस्वी स्टार्टअपची निर्मिती करणारे समीर धामणगावकर, समलिंगी ही स्वत:ची ओळख न लपवता त्यांच्यासाठी कार्य उभारणारा गे ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर नक्षत्र बागवे, बुद्धिबळपटू भक्ती कु लकर्णी, नेमबाज तेजस्विनी सावंत, ‘पाणवठा’ संस्थेचे गणराज जैन, ‘स्नेहालय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल गावडे, घोंगडी आणि गोधडीच्या कलेच्या जोरावर नवउद्योग उभारणारे नीरज बोराटे, तरुण संपार्श्वशोधक डॉ. तुषार जावरे, ‘शालीन कंपोझिट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे पराग पाटील, उद्योजक शेतकरी श्रीपाद जगताप, चित्रकार पराग बोरसे, बांबूपासून वस्तुनिर्मिती करणाऱ्या मीनाक्षी वाळके यांच्याबरोबरीने मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री – दिग्दर्शिका रसिका आगाशे, लेखक प्राजक्त देशमुख, लेखक क्षितिज पटवर्धन आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव अशा वीस तरुण तेजांकितांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांचे खुमासदार सूत्रसंचालन, सावनी वझेचा छोटेखानी एकपात्री विनोदी कार्यक्रम, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली उपस्थिती व त्यांच्याकडून पुरस्कार स्वीकारणाऱ्या या तरुण तेजांकितांच्या चेहऱ्यावरील आनंदाने हा सोहळा खऱ्या अर्थाने संस्मरणीय के ला. शनिवारी हा कार्यक्रम पाहण्याची संधी हुकली तर ‘एबीपी माझा’ वाहिनीवर हा सोहळा पुन्हा रविवारी, ४ एप्रिलला दुपारी १२ वाजता पाहता येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) हे मुख्य प्रायोजक होते. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वल्र्ड वेब सोल्यूशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको हे सहप्रायोजक होते. एम. के. घारे ज्वेलर्स पॉवर्ड बाय पार्टनर होते, तर प्राइस वॉटर हाऊस कुपर्स यांनी नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहिले, तर टेलीव्हिजन पार्टनर म्हणून ‘एबीपी माझा’चे सहकार्य उपक्रमाला लाभले.

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बॅँक लि., वल्र्ड वेब सोल्युशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको

पॉवर्ड बाय : एम. के. घारे ज्वेलर्स

नॉलेज पार्टनर : प्राईसवॉटरहाऊसकुपर्स

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा

कधी : आज, ३ एप्रिल

केव्हा : दुपारी ४ वाजता

Story img Loader