‘रेलटेल’ काम करणार;  १० हजार ३४९ डब्यांत कॅमेरे

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोकलच्या महिला डब्यांबरोबरच सर्वसामान्य डब्यांतही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या प्रस्तावाला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती. हे कॅमेरे बसवण्याचे काम ‘रेलटेल’ करणार असून रेल्वे बोर्डाकडून लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. लोकल डब्यांबरोबरच डेमू, मेमू गाडय़ांच्या डब्यांतही कॅमेरे बसणार आहेत.

प्रवासादरम्यान महिलांवर हल्ले होत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी लोकलमधील महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. त्यानुसार सध्या मध्य रेल्वेच्या चार लोकल गाडय़ांमधील प्रत्येकी पाच डब्यांत १६ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

हे काम सुरू असतानाच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या सर्व डब्यांत कॅमेरे बसवण्याची घोषणा केली होती आणि मध्य रेल्वेने तसा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविला. अर्थसंकल्पात त्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली. त्यात मध्य रेल्वे विभागातील लोकल डब्यांबरोबरच दिवा ते रोहा, दिवा ते वसई मार्गावर धावणाऱ्या मेमू गाडय़ा, पुणे येथे लोकल नागपूर येथे डेमू गाडय़ांतील डब्यांचाही समावेश आहे.

एकूण १० हजार ३४९ डब्यांत कॅमेरे बसविले जाणार असून त्याचे काम ‘रेलटेल’ करणार असल्याची माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. त्याची रेल्वे बोर्डाकडून प्रक्रिया सुरू असून लवकरच हे काम सुरू केले जाईल, असेही ते म्हणाले.

सध्या लोकलच्या २० महिला डब्यांत कॅमेरे आहेत आणि दोन ते तीन महिन्यांत आठ लोकलच्या महिला डब्यातही सुरक्षेसाठी सीसीटीव्ही असतील. या आठ लोकल बम्बार्डियर असून त्या चेन्नईतील रेल्वे कारखान्यातून मुंबईत दाखल होणार आहेत.