रेल्वेतून प्रवास करताना योग्य तिकीट न घेता तसेच फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वर्षभरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून ही आकडेवारी समोर आली आहे. या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून मध्य रेल्वेने मे २०१८ ते मे २०१९ या काळात सुमारे ११.१४ कोटी रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. १,९०,६८० विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेने १,२५,५२९ विनातिकीट प्रवाशांकडून ६ कोटी रुपये वसूल केले होते.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अशा प्रकारे फुकटात प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी संपूर्ण मुंबई विभागात विशेष मोहिम राबवण्यात आली. रेल्वे स्टेशन्सच्या प्रवेशद्वारावर आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर आम्ही वाढीव कर्मचारी तैनात केले होते. त्याचबरोबर भरारी तिकीट तपासणीवर आम्ही विशेष लक्ष दिले होते. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.

बऱ्याचदा प्रवासी गर्दीमुळे किंवा घाईत असल्या कारणाने विनातिकीट प्रवासाचे धाडस करतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये देशभरात १.८७ कोटी लोकांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले आहे. मात्र, फुकट्या प्रवाशांची ही संख्या गेल्या वर्षी २.७६ कोटींवर पोहोचल्याचे रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

रेल्वेच्या डेटानुसार, देशभरात साधारण दररोज ७५,००० प्रवाशी विनातिकीट अथवा अयोग्य तिकीटावर प्रवास करतात. या प्रवाशांवर कारवाईतून भारतीय रेल्वेच्या तिजोरीत एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ या काळात ५,९४४.७१ कोटी रुपयांची भर पडली आहे.