काँग्रेसची भूमिका ; चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा

कोणत्याही अटी व शर्थीशिवाय सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. पाच एकराची अट घातल्यास विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार नाही याकडेही काँग्रेसच्या वतीने लक्ष वेधण्यात आले.

सरकारने सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाची माहिती सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीबाबत चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात आदी नेते याप्रसंगी उपस्थित होते.

कोणत्याही अटीविना सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली. अटी व शर्थी घालून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनेतून वगळण्याचा घाट सरकारने घातला आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होईल. कर्जमाफीसाठी काँग्रेसने गेले दोन वर्षे सातत्याने मागणी केली होती. सरसकट सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्जमाफीबाबत लेखी म्हणणे येत्या दोन दिवसांमध्ये सरकारला सादर केले जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

शेतकरी विरोधी भूमिका घेणार कशी ?

कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका रास्त असली तरी शेतकरी विरोधी भूमिका घेणार कशी, अशी अडचण काँग्रेसची झाली आहे. वर्षांनुवर्षे सत्तेत राहिल्याने कर्जमाफीमुळे तिजोरीवर येणारा बोजा व त्याचे होणारे परिणाम याची चांगली जाणीव असली तरी उघडपणे शेतकरीविरोधी भूमिका घेता येत नाही, असे मत काँग्रेसच्या एका नेत्याने मांडले. यामुळेच सरसकट कर्जमाफी या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.