काँग्रेस नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली आहे. रविवारी त्यांना नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईत अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. अशोक चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला आणलं जात असून या प्रवासासाठी १२ तास लागणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांच्यावरील पुढील उपचाराला सुरुवात होईल. मुंबईमधील लिलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अशोक चव्हाण यांना रविवारी नांदेडमध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाची लागण झाल्या असल्याच्या वृत्ताला मुंबईतील कार्यालयाने दुजोरा दिला आहे. अशोक चव्हाण हे गेल्याच आठवडय़ात मुंबईहून नांदेडला गेले होते. मुंबईतून गेल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. यावेळी त्यांनी आपली करोना चाचणीही करुन घेतली होती. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता संसर्ग झाल्याचं निषन्न झालं.
अशोक चव्हाण सकाळी रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी निघाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना हात दाखवून सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं. अशोक चव्हाण यांची प्रकृती चांगली असून त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.