करोना विषाणू कागद, कापड यांसारख्या सच्छिद्र पृष्ठभागांवर कमी काळ टिकतो, तर काच व प्लास्टिक यासारख्या सच्छिद्र नसलेल्या पृष्ठभागांवर तुलनेने जास्त काळ टिकून राहू शकतो, असे मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे आयआयटीने केलेल्या संशोधनात म्हटले आहे.

कोविड १९ विषाणू हा श्वसनातील कणांच्या माध्यमातून पसरत असतो. विषाणूचे कण एखाद्या इतर वाहक कणांवर स्वार होऊन पसरत जातात. ‘फिजिक्स ऑफ फ्लुइडस’ या शोधनिबंधात म्हटले आहे, की सच्छिद्र व अभेद्य पदार्थावर विषाणू किती टिकू शकतात याचा अभ्यास करण्यात आला असून, सच्छिद्र पदार्थात ते कमी टिकतात व सच्छिद्र नसलेल्या पदार्थाच्या पृष्ठभागावर ते जास्त  टिकतात. सच्छिद्र पदार्थात फार काळ काही कण द्रव रूपात फार काळ राहू शकत नाहीत. त्यामुळे विषाणू टिकू शकत नाहीत.

संशोधनात म्हटले आहे, की विषाणू काच व इतर पृष्ठभागांवर चार दिवस टिकून राहू शकतो. प्लास्टिक व पोलादावर तो जास्त काळ टिकून राहू शकतो. विषाणू कापड व कागदावर किमान तीन तास टिकू शकतो.

आयआयटी मुंबईचे संशोधक संघमित्रो चटर्जी यांनी सांगितले, की आमच्या अभ्यासानुसार रुग्णालयातील व कार्यालयातील फर्निचरमध्ये सच्छिद्र नसलेल्या घटकांचा फारसा वापर करू नये, पण तरी काच, स्टेनलेस स्टील, लाकूड  वापरले असेल तर त्यावर सच्छिद्र पदार्थ असलेले आवरण टाकावे म्हणजे कापड टाकले तर त्यामुळे संसर्ग कमी होऊ शकतो.

उद्याने, शॉपिंग मॉल, रेस्तराँ व रेल्वे तसेच विमानतळावरील खोल्या येथे कापडाचा वापर करण्यात यावा. त्यामुळे विषाणूचा प्रसार कमी होईल. संशोधकांच्या मते ९९.९ टक्के कण हे द्रव रूपात असतात व त्यांचे काही मिनिटात बाष्पीभवन होते.

सुरुवातीच्या अवस्थेत सूक्ष्म असे पातळ द्रव घन आवरण पदार्थावर राहते, त्यात विषाणू टिकून राहतो, असे अभ्यासात म्हटले आहे.

संशोधन करणाऱ्या समूहात जननी श्री मुरलीधरन, अमित अगरवाल, रजनीश भारद्वाज यांचा समावेश होता. त्यांनी म्हटले आहे की, द्रवाचे बाष्पीभवन झाल्यानंतर सच्छिद्र पदार्थावरील अवशेष अभेद्य पृष्ठभागापेक्षा लवकर नष्ट होतो, त्यामुळे विषाणू टिकू शकत नाही.

संपर्क रेषेजवळचा द्रव, सच्छिद्र पृष्ठभागावरील समांतर धागे यांत कण हे परासरणाने पसरतात. त्यामुळे द्रवाचे बाष्पीभवन लवकर होते. कारण त्यात रिक्त जागा बऱ्याच असतात.

तज्ज्ञांची निरीक्षणे..

* सच्छिद्र पदार्थाच्या भूमितीय वैशिष्टय़ांमुळे द्रवाचा थर सच्छिद्र पदार्थात कमी टिकतो. त्यात रासायनिक गुणधर्माचा समावेश कमी असतो. कागदावर द्रवाचा थर सहा तास राहतो, त्यामुळे विषाणूचे कण पसरू शकतात. त्यामुळे शाळांसारख्या ठिकाणी कागदाचा वापर जास्त असतो तेथे काळजी घेण्याची गरज असते.

* काचेवर चार दिवस विषाणू टिकतात. कागदावर विषाणू कमी काळ राहात असले तरी वह्य़ा-पुस्तकांची देवाणघेवाण धोक्याची ठरू शकते, असे संशोधकांचे मत आहे.

* शाळा पुन्हा सुरू करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत धोरण ठरवताना या निरीक्षणांची मदत होणार असून बँकांमध्ये नोटांची देवाणघेवाण करतानाही काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.

* तुलनेने ई व्यापारात वापरल्या जाणाऱ्या कार्डबोर्ड पेटय़ा तुलनेने सुरक्षित आहेत. त्यात विषाणू फार काळ टिकू शकत नाही.