‘यूजीसी’कडून विद्यापीठे, महाविद्यालयांना सूचना

‘देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार’, असा उल्लेख असलेला फलक लावण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्थांना दिले.

करोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या मार्गदर्शक सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्या. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्याबाबतचा फलक लावण्याचे निर्देश देतानाच हे फलक समाजमाध्यमांमध्येही प्रसारित करण्यास सांगितले आहे. या संदर्भात जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सूचनेत काय?

‘केंद्र सरकारकडून १८ वर्षांवरील सर्वांचे २१ जूनपासून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंग्रजी आणि हिंदीतील फलकाबाबतचे स्वरूप ठरवून दिले आहे. त्यानुसार हे फलक आपल्या संस्थेमध्ये लावावेत,’ असा संदेश जैन यांनी पाठवला . या संदेशासोबतच्या चित्रामध्ये ‘धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असे नमूद के ले आहे.

शिक्षणवर्तुळातून आश्चर्य…

दिल्ली, हैदराबाद, भोपाळ येथील विद्यापीठांनी ‘धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी’ हा संदेश देणाऱ्या फलकाचे छायाचित्र समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध केले. दरम्यान, ‘यूजीसी’च्या या सूचनेवरून शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी संघटना आणि काही राजकीय पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.