मुंबईतील करोनाबाधित निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयाने २५ लाखांचं बिल दिल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंगरी पोलीस ठाण्यात कर्तव्यास असणारे ५८ वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम घुगे ३१ मार्च रोजी निवृत्त झाले. तुकाराम घुगे यांना करोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालयाने त्यांना तब्बल २५ लाखांचं बिल आकारलं आहे. यानंतर त्यांच्या कुटुंबाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून मदत मागितली आहे. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
तुकाराम यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तुकाराम यांची पत्नी सुशिला यांनी पत्रात दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी त्यांना सर्दी आणि ताप आला होता. पण शेवटचे १० दिवस कर्तव्य बजावण्याची इच्छा असल्याने त्यांनी सुट्टी टाकली नाही.
स्थानिक डॉक्टराने तुकाराम यांची करोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. “मे महिन्यात करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुंबई सेंट्रलमध्ये पोलीस कॉलनीत राहत असल्याने वेगळ्या शौचालयाची सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे तुकाराम यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यांची प्रकृती अद्याप सुधारलेली नाही,” असं पत्रात सांगण्यात आलं आहे.
सुशिला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंब तुकाराम यांच्यावरच अवलंबून असून रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. तुकाराम यांच्या मुलाने सरकार आर्थिक मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “मित्र आणि नातेवाईकांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आता आम्ही गृहविभाग आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे मदत मागितली असून ती मिळेल,” अशी अपेक्षा त्यांच्या मुलाने व्यक्त केली आहे.
तुकाराम यांच्या कुटुंबाने आतापर्यंत १३ लाख रुपये जमवले असून अजूनही त्यांना गरज आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सरकारी नियमानुसार पोलीस कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनाही संपते. तरीही आम्ही मदतीसाठी इतर काही मार्ग आहे का शोधत आहोत”.