करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत असताना पोलीसदेखील आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर सुरक्षा देत आहेत. मात्र नागरिक आणि कायद्याचं रक्षण करणाऱ्य पोलिसांवर हल्ला होत असल्याच्या अजूनही समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली असून २७ वर्षीय तरुणाने पोलिसांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आर्किटेक्ट असणाऱ्या या आरोपीचं नाव करण नायर असून त्याला अटक करण्यात आली आहे. मरिन ड्राईव्हला हा सगळा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान तरुणाला हटकलं असता त्याने बॅगेतून कोयता काढला आणि पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके जखमी झाले. हल्ला केल्यानंतर त्याने पळ काढला. यानंतर पोलिसांनीही त्याचा पाठलाग करत थांबवण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस पाठलाग करत असतानाही तरुण थांबण्याचं नाव घेत नव्हता. अखेर पोलिसांनी काठी आणि दोरीच्या सहाय्याने त्याला पकडलं आणि अटक केली.

पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतानाही तरुण काहीच ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. तरुणाच्या कुटुंबाने गेल्या दोन महिन्यांपासून तो विचित्र वागत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. आरोपीची आई एअर इंडियामध्ये कामाला आहे. आर्किटेक्ट असल्याने बांबू कापण्यासाठी त्याने कोयता आणला होता असा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Story img Loader