करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत भाजपाने ‘ माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली असून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. राज्यभरातील भाजप कार्यकर्ते व नागरिक घराबाहेर फलक, काळे झेंडे फडकवतील, काळ्या फिती लावतील आणि सरकारचा निषेध करत आहे. भाजपा आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज्यभरात होणाऱ्या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. दरम्यान ट्विटरच्या माध्यमातूनही ते राज्य सरकारवर टीका करत आहे.

यावेळी भाजपाने काही ट्विट केले आहेत. यामधील एका ट्विटमध्ये भाजपाने पोलिसांची पिळवणूक, पत्रकारांचा छळ, साधूंची हत्या, गरीबांचे पैसे लाटणे बंद करा आणि शेतकरी,शेतमजुरांना ५० हजार कोटींचे पॅकेज द्या अशी मागणी केली आहे.

यावेळी भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख महाभकास आघाडी असा केला जात असून #MaharashtraBachao हा हॅशटॅगही ट्रेंड केला जात आहे.

आणखी वाचा- राज्य सरकार पूर्णपणे निष्क्रिय, एकही नवा पैसा खर्च करण्यास तयार नाही – देवेंद्र फडणवीस

केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही शेतकरी, मजूर, कामगार, बारा बलुतेदार व इतर अडचणीत आलेल्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी भाजपची मागणी आहे. मुंबईत परिस्थिती गंभीर असून रूग्णांचे हाल होत आहेत. त्यासाठी उपचारांची योग्य व पुरेशी व्यवस्था करावी, अशीही मागणी भाजपाकडून केली जात आहे. जनतेसाठी प्रभावीपणे काम करण्यास सरकारला भाग पाडावे, यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलनातील हा दुसरा टप्पा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.