करोनाच्या पार्श्वभुमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईत लष्कराला पाचारण केलं जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबई पोलिसांनी ही पूर्णणणे चुकीची माहिती असून अफवा पसरवू नका असं आवाहन केलं आहे. मुंबईत लष्कर किंवा निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आलेलं नाही अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसंच मोकळ्या वेळाचा सदुपयोग करा असा सल्लाही दिला आहे.

देशात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातही मुंबई, पुणे या शहरांमध्ये करोनाचे सर्वात जास्त रुग्ण असून हॉटस्पॉट ठरले आहेत. दरम्यान मुंबईत परिस्थिती नियंत्रणात नसल्याने लष्कराला पाचारण केल्याची अफवा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ट्विट केलं आहे. मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे की, “तुमच्याकडे खूप मोकळा वेळ आहे याची आम्हाला कल्पना आहे. पण या वेळेचा वापर अफवा पसरवण्यापेक्षा इतर चांगल्या गोष्टी करण्यासाठी केला जाऊ शकतो. तुम्हाला जीवनाश्यक वस्तू गोळा करण्याची गरज नाही. लष्कर किंवा निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आलेलं नाही. शांत रहा आणि घरीच थांबा. करोनाविरोधातील लढाईत हेच जास्त महत्त्वाचं आहे”.

राज्यात मागील चार दिवसात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. चार दिवसांमध्ये रुग्णांची संख्या ४०,००० वरून थेट ५०,००० इतकी झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं काळजीची बाब म्हणजे यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या शुक्रवारी (८ मे) ५६ हजारांवर पोहोचली आहे. करोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच करोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत आहे. लॉकडाउनच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. त्याचा अनुकूल परिणाम गेल्या महिनाभराच्या आकडेवारीतून दिसून आला होता. करोनाच्या प्रसारावर परिणाम झाल्याचं निरीक्षण अभ्यासातून दिसून आलं होतं. मात्र, मागील चार दिवसांच्या आकडेवारीनं नवं आव्हानं सरकारसमोर उभं राहिलं आहे.

आणखी वाचा- धक्कादायक! मुंबईतील ऑर्थर रोड तुरूंगातील ७७ कैदी व २६ पोलिसांना करोनाची लागण

३ ते ६ मे या चार दिवसांच्या कालावधीमध्ये रुग्णांच्या संख्येनं उसळी मारल्याचं दिसून आलं. या चार दिवसांमध्ये तब्बल दहा हजार जणांना करोना झाल्याचं समोर आलं. त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४०,००० वरून थेट ५०,००० इतकी झाली. यात सात राज्यांमध्ये ३००० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.

Story img Loader