महाराष्ट्र आणि मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत, हे केंद्रातल्या नेत्यांनी लक्षात ठेवण्याची गरज असून यादी कशाला मागत आहेत? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली असून याआधीदेखील अनेक गाड्या यादीशिवाय महाराष्ट्रातून सुटल्या आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि केंद्र यांच्यात समन्वय महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्याचं वातावरण पाहता पियूष गोयल यांची चिडचीड होणं साहजिक आहे. आम्हाला अपेक्षित गाड्या मिळाल्या नाहीत, त्या मिळाल्या असत्या तर स्थलांतरित मजूर लवकर घरी पोहोचले असते असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

“पियूष गोयल हे राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करतात, तुम्ही देशाचे मंत्री आहात, पण या राज्याचे प्रतिनिधीत्व करता. महाराष्ट्राचे आणि मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत हे केंद्रातील प्रत्येक नेत्याने समजून घ्यावे. यादीचं म्हणत असाल तर सरकारने न मागताही यादीशिवायही महाराष्ट्रात नागपूर, पुण्यातून गाड्या सुटल्या आहेत. त्याची यादी आमच्याकडे आहे. उगाच यादी कशाला मागता,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करता हे विसरू नका; राऊतांनी रेल्वेमंत्र्यांना करून दिली आठवण

“महाराष्ट्र हे विरोधकांचं राज्य आहे हे जर डोक्यातून काढलं तर यादीची गरज पडणार नाही, महाराष्ट्राचं नेतृत्व करणारेच केंद्रातले नेते याद्या मागत आहेत. फक्त महाराष्ट्राकडेच यादी मागितली जात असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्राचे केंद्रातील मंत्री असं वागतात याचं आश्चर्य आणि खेद आहे,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- यापुढे युपीमधील कामगार हवे असतील तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक: योगी

योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर –
योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सांगितलं आहे की, “तसं असेल तर आम्हाला देखील येथे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज सुरु केलं पाहिजे. सर्वांना पारखून घेतलं पाहिजे. उत्तर प्रदेशातील मजूर त्यांच्या गावात नीट पोहोचलेत का? त्यांना अन्न पाणी नीट मिळतंय का याकडे योगींनी लक्ष द्यावं. दीड महिना महाराष्ट्रात मजुरांची कशी व्यवस्था केली होती याचे व्हिडीओ पाठवू शकतो. महाराष्ट्रात या मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते योगींना कदाचित आवडलं नसेल,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. भाजपा व्यतिरिक्त सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं आहे असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- …म्हणून शरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

राजभवानात गेल्यावर पुन्हा जावंसं वाटतं –
शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्याच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “राजभवन हा परिसर निसर्गरम्य आहे एकदा गेल्यावर सारखं सारखं जावंसं वाटतं. निसर्गशिल्प आहे, चांगली वास्तूकला आहे. बाजूला समुद्र आहे, मोरांचे थवे येतात. मुंबईत असल्यान हे पहायला मिळत नाही. राज्यपाल मायाळू असले की चहासाठी बोलावतात. तेवढंच निसर्गदर्शन होतं. त्यांच्याशी संवाद साधायला मिळतो,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

टीका केल्यानंतर आता भेटी घेत असल्यासंबंधी बोलताना त्यांनी एखाद्या घटनेवर टीका करणं म्हणजे त्या व्यक्तीशी संपर्क तोडणे होत नाही. हे आपल्या राज्याचे संस्कार नाहीत. एखाद्या घटनेवर टीका करणे संविधानाने दिलेला अधिकार, एखाद्या घटनेवर संवाद असायला हवा असं त्यांनी सांगितलं.

Story img Loader