लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना पुन्हा आपल्या घरी परतण्यासाठी मदत करत असल्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अभिनेता सोनू सूदचं कौतुक केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद स्थलांतरितांसाठी बसेसची व्यवस्था करत असून त्यांना आपल्या राज्यात पाठवत आहे. बसेस तसंच प्रवाशांच्या जेवणाचा सगळा खर्च सोनू सूदने उचलला आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक तसंच महाराष्ट्रातीलही काही स्थलांतरित ट्विट करुन सोनू सूदकडे मगत मागत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सोनू सूद प्रत्येक ट्विटला उत्तर देत असून मदत मिळेल याची खात्री देत आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनू सूदने दिलेलं असंच एक उत्तर रिट्विट केलं असून गरजूंना मदत करत असल्याबद्दल आभार मानले आहेत. “एक सहकारी म्हणून जवळपास दोन दशकांपासून तुला ओळखण्याचं भाग्य मला लाभलं आहे. तुला एक अभिनेता म्हणून मोठं होताना पाहिलं आहे. पण या कठीण काळात तू दाखवलेल्या माणुसकीमुळे तो अभिमान कायम ठेवला आहे. गरजूंना मदत केल्याबद्दल आभार,” असं ट्विट स्मृती इराणी यांनी केलं आहे.

अभिनेता आणि भाजपा नेते रवी किशन यांनीदेखील स्मृती इराणींच्या ट्विटला उत्तर देत सोनू सूदचं कौतुक केलं आहे. “हेच सर्व तर जगात लक्षात राहतं,” असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘आईला सांग मी लवकरच घरी येतोय’; सोनू सूदचं विद्यार्थ्याला आश्वासन

स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू सूद स्वत: रस्त्यावर उतरला असून मजूर आणि त्यांच्या कुटुंबासाठी बसेसची व्यवस्था करत आहे. स्थलांतरित मजुरांना रस्त्यावर चालताना पाहणं आपल्यासाठी खूप कष्टदायी असल्याचं सांगत सोनू सूदने मदतीला सुरुवात केली होती. एका मुलाखतीत बोलताना सोनू सूदने सांगितलं होतं की, “देशातील प्रत्येक जण चालत जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांची चिंता करत आहे. आपल्या वयस्कर आई-वडील, लहान मुलांसोबत चालणाऱ्या मजुरांना पाहून मला फार वाईट वाटलं होतं. यावेळी बंद असलेल्या बसेसचा आपण वापर करु शकतो असं माझ्या लक्षात आलं”.

आणखी वाचा- कर्नाटकनंतर आता बिहार, झारखंडच्या मजुरांना सोनू सूदचा आधार

सोनू सूद महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसेसची सोय करत असून आतापर्यंत त्याने कर्नाटकमधील गुलबर्गा आणि उत्तर प्रदेशसाठी पाठवल्या आहेत. यासाठी सोनू सूदने महाराष्ट्रासहीत दोन्ही राज्यांकडून रितसर परवानगी घेतली होती. सोनू सूदला प्रत्येक बसमागे जवळपास ६० हजार ते दोन लाखांचा खर्च येत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड तसंच इतर राज्यांमध्ये रोज १० ते २० बस पाठवण्याचा माझा प्रयत्न असणार असल्याचं सोनू सूद सांगतो. सोनू सूदने पंजाबमधील डॉक्टरांसाठी १५०० पीपीई किटही पाठवले आहेत. इतकंच नाही तर सोनू सूदने ठाण्यातील कळवा येथे मजुरांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. सोनू सूदने आतापर्यंत एक लाखाहून जास्त लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. सोनू सूद करत असलेल्या मदतीचं नेटिझन्सकडूनही कौतुक केलं जात असून पडद्यावर विलन साकारणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात हिरो ठरल्याचं म्हणत आहे.

Story img Loader