मुंबई: गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात सुरू झालेल्या करोनाच्या थैमानाने आतापर्यंत दीड हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला असून रुग्णांची संख्या जवळपास ५० हजारांच्या घरात पोहचली आहे.

करोनाचा शिरकाव झाल्यापासून आता बरोबर ७७ दिवस झाले आहेत. मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्य़ांमध्येही संसर्ग प्रसार वाढत आहे. राज्यात सध्या सुमारे ३० हजार रुग्ण उपचार घेत असून यातील जवळपास दीड हजार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. सर्वाधिक रुग्ण हे २१ ते ४० वयोगटांतील आहेत.

महिनाभरात दरदिवशीच्या चाचण्यांची क्षमता चार हजारांहून १३ हजारांवर पोहचली असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत मात्र कमीच आहे. राज्यात आतापर्यंत ३ लाख ६३ हजार चाचण्या झालेल्या असून यातील १५ टक्के हे करोनाबाधित असल्याचे आढळले आहे. चाचण्या आणि रुग्णसंख्या यांचा परस्पर संबंध असल्याने रुग्णवाढीचा वेग हा चाचण्यांवर अवलंबून आहे. चाचण्या अधिक प्रमाणात तितक्या प्रमाणात रुग्णांचे निदान लवकर होणार. त्यामुळे रुग्णवाढीचा वेग ही संकल्पना फसवी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 मनुष्यबळाचे आव्हान

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील ६६ टक्के जागा तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील ४१ टक्के जागा सध्या रिक्त आहेत. महत्त्वाच्या पदांपैकी अतिरिक्त संचालक(२), सहसंचालक(३), उपसंचालक(११), सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी(२८ पैकी २५), अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी(३१ पैकी २३), सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक(४३ पैकी २५) आणि ३ हजार १२४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या जागा भरलेल्या नाहीत. हे अफाट मनुष्यबळ कसे उभारायचे याची चिंता आता कुठे राज्य सरकारला लागली आहे.

टाळेबंदीतील मृत्यू

टाळेबंदीच्या या दोन महिन्यांत २०० जणांना जीव गमवावा लागला. टाळेबंदी उठायला अवघे सहा दिवस आहेत. पण अजूनही अनेक शहरांमधून परप्रातींयांचे जत्थे त्यांच्या गावाची वाट धरत आहेत. काहींनी अपघातात तर वाहन नसल्याने पायीच घरी निघाल्याने आणि उन्हामुळे, भुकेने रस्त्यातच प्राण सोडले. यात तरुण, महिला, मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिक, लहान, तान्ही मुले अशा सगळ्याच वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय नसल्याने नाइलाजाने ट्रक, टेम्पोतून प्रवास करणाऱ्या १५० हून अधिक व्यक्तींचा अपघातात मृत्यू झाला. तर पायीच निघालेले, पण थकव्याने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या काहींचा ट्रक, ट्रेलर, टेम्पो, रेल्वेने चिरडल्याने मृत्यू झाला. साधारण दहा-बारा जण उष्माघाताने, हृदयविकाराच्या झटक्याने गेले. सात-आठ जणांनी आत्महत्या केल्या.

Story img Loader