दोन वेळच्या जेवणाची सोय; अन्नधान्य, किराणा मालाचे वाटप
मुंबई : करोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या वर्गाला बसला असून या घटकाला मदतीचा हात देण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. या कष्टकऱ्यांच्या पुढील काही दिवसांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून अन्नधान्य आणि किराणा मालाचे वाटप या कुटुंबांना करण्यात येत आहे, तर रस्त्यावर राहणाऱ्या बेघर नागरिकांसाठी शिजवलेले अन्न पुरवून संस्था माणुसकीचे जपताना दिसत आहेत.
युवा संस्थेच्या वतीने मुंबई, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार परिसरातील नाका कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, अपंग नागरिक, बेघर अशा सुमारे २५ समुदायांतील बंदमुळे प्रभावित झालेल्या घटकांना अन्नधान्य आणि किराणा मालाचे वितरण करण्यात येत आहे. १००० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. नालासोपारा येथील भीमनगर भागातील ३०३ कुटुंबांना संस्थेच्या वतीने धान्य, डाळी, पीठ, तेल आदी गरजेच्या गोष्टी पुरवण्यात आल्याची माहिती युवा संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक नामदेव गुलदगड यांनी दिली. आजघडीला १००० कुटुंबांना मदत पुरविण्याचे नियोजन झाले असून टाळेबंदी सुरू असेपर्यंत मदतकार्य सुरू राहील, असेही नामदेव यांनी सांगितले.
‘घर बचाओ, घर बनाओ’ संस्थेच्या वतीने मानखुर्द, शिवाजीनगर, मालवणी, कांदिवली, कांजुरमार्ग परिसरातील ४०० कुटुंबांना दहा दिवस पुरेल एवढय़ा अन्नधान्य आणि किराणा मालाची मदत करण्यात आली आहे. यात मुंबईत अडकलेल्या पश्चिम बंगाल आणि ओदिशा राज्यातील १४० स्थलांतरीत मजुरांना अन्नपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ठाण्यातील रस्त्यावर भटकणाऱ्या ४० श्वानांनाही खाद्यपदार्थ दिल्याची माहिती बिलाल खान यांनी दिली.
सीआयटीयू आणि डीवायएफआयच्या वतीने मुंबईत अडकलेल्या सुमारे ३५० मजुरांना खाद्यपदार्थाचा पुरवठा करण्यात आला. महानगरपालिके ने दिलेल्या वाहनांच्या मदतीने वडाळा, सांताक्रुझ, अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे परिसरात काम करणाऱ्या या मजुरांपर्यंत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अन्नपदार्थ पोहचविले. तर ‘अलर्ट सिटीझन फोरम’च्या माध्यमातून दिवा, कळवा, दहिसर, जोगेश्वरी, बोरीवली, सांतक्रुझ भागातील नाका कामगार, गरजू कुटुंबे आणि अपंग नागरिकांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य दिल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष निरंजन आहेर यांनी दिली. त्याचबरोबर टाळेबंदीमुळे केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ‘अलर्ट सिटीझन फोरम’ आणि जोगेश्वरीतील ‘जय जवान गोविंद’ मिळून सुमारे ६०० नातेवाईकांना अन्नपुरवठा करत आहेत. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या परिचारिका आणि महिला डॉक्टर यांना रुग्णालय ते घर असा प्रवास करण्यात अडचण येऊ नये यासाठी संस्थेच्या वतीने गाडीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहेर यांनी दिली.
‘असोसिएशन ऑफ सोशल बियाँण्ड बाउन्ड्रीज’ या संस्थेतर्फे रस्त्यांवरच्या सुमारे १५० कुत्रे आणि मांजरी यांच्यासाठी अन्न दिले जात आहे. त्याचबरोबर बंदमुळे अन्न मिळविण्यात अडचणी येणारे रखवालदार, पोलीस कर्मचारी, रस्त्यावरचे भिकारी अशा १५० जणांना संस्थेचे सदस्य तयार अन्न देत असल्याची माहिती सागर जैन यांनी दिली.
वांद्रे परिसरातील बेहराम पाडा, ज्ञानेश्वर नगर, गोळीबार या भागातील नागरिकांना ‘हॅबिटाट अँड लाईव्हलीहुड वेलफेअर असोसिएशन’च्या माध्यमातून मदत पोहचविली जात आहे. मित्र-मैत्रीण आणि दानशूर नागरिकांच्या सहकार्याने संस्थेने सुमारे १५० कुटुंबे आणि ९५ मजुरांना आठवडाभर पुरेल इतके अन्नधान्य दिल्याची माहिती संस्थेच्या संचालक श्वेता तांबे यांनी दिली. ‘करुणा-घर फाउंडेशन’च्या वतीने ठाण्यातील उपवन, घोडबंदर परिसरात रस्त्याकडेला राहणारे भिकारी, त्याचबरोबर स्थलांतरीत मजुरांना अन्नपदार्थ दिले जात आहेत. जवळपास ६० ते ७० नागरिकांना दरदिवशी अन्नपदार्थांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती अभिषेक सोनवणे यांनी दिली.
टाळेबंदीचा मार सहन करावा लागत असलेल्या घटकांना सेवाभावी संस्था आणि नागरिकांकडून मदत पोहचविली जात आहे. मात्र ती अपुरी असून आणखीही नागरिकांनी त्यांचे आर्थिक सहाय्य द्यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. त्याचबरोबर सरकारने या घटकांच्या मदतीसाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणीही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.