दादरमधील नायगाव येथील पोलिसांच्या कुटुंबीयांना घरं खाली करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. पोलीस वसाहत धोकादायक असल्याने या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांकडून आक्रोश व्यक्त केला जात असून विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. दरम्यान पोलिसांचे कुटुंबीय आज याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झाले होते. राज ठाकरेंनी यावेळी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.

घरं खाली करण्यास सांगितल्याने सध्या पोलिसांच्या कुटुंबीयांकडून हतबलता व्यक्त केली जात आहे. घरं सोडून आम्ही जायचं कुठे असा प्रश्न ते विचारत आहेत. याचसाठी आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या बायका आणि मुलं आपली व्यथा घेऊन राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना चिंता करु नका सांगत आपण याचा पाठपुरावा करु असं आश्वासन दिलं.

“राज्य शासनामार्फत नायगावमधील घरं खाली करण्याची नोटीस संबधित पोलिसांना देण्यात आल्या आहेत.अचानक नोटीस आल्याने पोलीस बांधव धास्तावले आहेत. याच धर्तीवर पोलीस कुटुंबीयांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आपली सुरक्षा करणाऱ्या पोलिसांनाच अशा पद्धतीने बेघर करणं योग्य नाही,” असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

फडणवीसांनी घेतली होती भेट

याआधी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नायगावमध्ये जाऊन पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी या इमारती धोकादायक वाटत नसल्याचं सांगत सरकारने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी केली होती. तसंच निर्णयाला स्थगिती द्या असंही म्हणाले होते. यावेळी त्यांनी रहिवाशांना आपण मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करु असं आश्वासनही दिलं होतं.

“वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू”

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही विरोध केला असून वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिसांच्या कुटुंबीयांना बेघर होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.