शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राणे-शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. संजय राऊत यांच्या घर आणि सामनाच्या कार्यालयाजवळ सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. भाजपा नेते नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि राणे-सेना वादानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“संजय राऊत यांना पक्षांतर्गत धोका वाढला असेल. कारण पुढेपुढे तेच दिसत आहेत आणि त्यामुळे शिवसेना पक्षाचं नेतृत्व करताना ते दिसत आहेत. ते संपादक आणि माझे मित्र असल्याने मला भीती आहे. सुरक्षा वाढवताना सरकारी यंत्रणांनी धोका कोणापासून आहे हे पाहावे. आमचे म्हणणे आहे की धोका हा अंतर्गत शत्रूंपासून आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यता आंदोलनावर बोलू नये

“मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे त्यांनी स्वातंत्र्यता आंदोलनावर बोलू नये. आधी त्यांनी हा ७५ वेळा हा भारताचा अमृत महोत्सव आहे हे बोलावे. भाजपा करोना रोखण्यासाठी सरकारच्या बाजूने आहे. पण निर्बंधांमध्ये वाटाघाटी करुन निर्बंधांचा धंद्याच्या आम्ही विरोधात आहोत,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.