खरेदीसाठी सहा महिने ते एक वर्ष आगाऊ नोंदणी
निखिल अहिरे, लोकसत्ता
ठाणे : करोना संकटात व्यायामाविषयी वाढलेली जागरूकता आणि वाढते इंधनदर या पाश्र्वभूमीवर स्वस्त पर्यावरणपूरक वाहतूक साधनांना दिले जाणारे प्राधान्य यामुळे काही महिन्यांपासून मुंबई महानगर क्षेत्रात सायकलींच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर विशिष्ट प्रकारच्या आयात सायकल उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना सहा महिने ते एक वर्ष आगाऊ नोंदणी करावी लागत आहे.
उत्तम दर्जाच्या आणि दूरच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि तुलनेने महाग असलेल्या ‘रोड बाईक्स’ची मागणी करोनाकाळात ३० ते ४० टक्क्य़ांनी वाढल्याची माहिती मुंबई, ठाण्यातील विक्रेत्यांनी दिली. मागणीच्या तुलनेत पुरवठा आटल्याने विशिष्ट प्रकारच्या सायकलींसाठी ग्राहकांना प्रतीक्षा यादीवर राहावे लागत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
करोना टाळेबंदी लागू झाल्यानंतर सायकल चालवणे या महत्त्वाच्या व्यायाम प्रकाराकडे अनेकांनी मोर्चा वळवला. टाळेबंदीच्या काळात लहान-मोठय़ा सर्वच व्यायामशाळांवर गंडांतर आले. त्यामुळे व्यायामप्रेमी तसेच आरोग्यदक्ष असणाऱ्या अनेकांनी तुलनेने सोपे आणि सहज करता येण्याजोगे व्यायाम प्रकार सुरू केले. त्यात सायकल चालवण्याचाही समावेश होतो. परिणामी, सहा महिन्यांपासून सायकलविक्रीत मोठी वाढ होत आहे, असे सायकल विक्रेत्यांनी सांगितले. साध्या सायकलींबरोबरच ‘रोड बाईक’ आणि ‘एमटीबी सायकल’ म्हणून प्रचलित असलेल्या महागडय़ा सायकलींच्या मागणीत वाढ झाली आहे. पाच हजार रुपयांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत या सायकल उपलब्ध होतात.
मागणीत अचानक वाढ झाल्याने मुंबई आणि महानगरांमध्ये मागणीच्या तुलनेत सायकलींचा तुटवडा आहे. सायकल खरेदीचे प्रमाण वाढल्याने मुंबई आणि उपनगरांमध्ये असणाऱ्या अनेक सायकल क्लबच्या सदस्यसंख्येत देखील कमालीची वाढ होत आहे. सायकल खरेदीकडे नागरिकांचा वाढलेला कल ही सुरुवात आहे. येत्या काळात याहून जास्त सायकल खरेदी होणार असल्याचे काही जुन्या विक्रेत्यांनी सांगितले.
तुटवडा कशामुळे?
एमटीबी आणि रोड बाईक सायकल प्रामुख्याने तैवान आणि चीनमधून आयात केल्या जातात. काही महिन्यांपासून या आयातीचे प्रमाण प्रचंड घटले आहे. मुंबई आणि महानगरांमध्ये या प्रकारच्या सायकलींच्या पुरवठादारांकडे तीन ते चार महिन्यांनी केवळ ९० ते १०० सायकल उपलब्ध होत आहेत. यामुळे हा तुटवडा जाणवत आहे. काही महागडय़ा आणि विशिष्ट कंपनीच्या सायकलींसाठी ग्राहकांना दोन ते चार महिने तर काहींना २०२२मधील तारखा देण्यात आल्या आहेत. देशात चेन्नई, लुधियाना आणि पुणे येथे अशा प्रकारच्या काही सायकलींची निर्मिती केली जाते. टाळेबंदीमुळे या व्यावसायिकांचे आणि पुरवठादारांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यामुळे मागणी असूनही हवा तसा पुरवठा करणे शक्य होत नाही, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली. पुरवठादारांनी सायकलीची पूर्ण किंमत आगाऊ घेण्याचे धोरण अनेक ठिकाणी स्वीकारले आहे. त्यामुळे विशिष्ट प्रकारच्या सायकलींची आगाऊ नोंदणी करूनच दुकानदार मागणी नोंदवितात. त्यामुळेही हा तुटवडा निर्माण झाला आहे, असे ४० वर्षांपासून सायकल विक्रीच्या व्यवसायात असलेले संजय फडतरे यांनी सांगितले.
आयातीत ५० टक्के घट
काही सायकली तैवान, चीनमधून भारतात आयात होतात. करोनामुळे या आयातीत ५० टक्क्य़ांहून अधिक घट झाली आहे. मागणी वाढली असली तरी पुरवठा नसल्याने सायकली सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, अशी माहिती नवी मुंबईतील एव्हरेट सायकलिंग क्लब कल्चरचे व्यवस्थापक जमीर काझी यांनी दिली. रोड बाईक आणि एमटीबी प्रकारातील चांगल्या परिस्थितीत असणाऱ्या जुन्या सायकलींची खरेदी करण्यात देखील ग्राहक रस दाखवत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
नागरिक सायकल चालवण्याच्या व्यायामास प्राधान्य देत आहेत. इंधनदरवाढीमुळे जवळच्या अंतरासाठी सायकल योग्य पर्याय ठरत आहे. त्यामुळे सायकलविक्रीत मोठी वाढ होत आहे.
– चिराग शहा, सायकलपटू, सायकल महापौर, ठाणे.
सायकलींच्या खरेदीत चांगली वाढ झाली आहे. आयात सायकली वेळेत येत नसल्याने ग्राहकांना सायकलींसाठी अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
– धनाजी जाधव, सायकल विक्रेते, कल्याण</strong>
विशिष्ट सायकलींना मागणी
’ व्यायामासाठी आणि शहराअंतर्गत फिरण्यासाठी एमटीबी या सायकलींची खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यांची १० हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत किंमत असते.
’लांब प्रवासाला जाण्यासाठी, कमी वेळेत जास्त अंतर कापण्यासाठी, ट्रेकिंग तसेच सायकलिंग स्पर्धामध्ये आणि साहसी खेळांमध्ये सहभाग घेण्यासाठी ‘रोड बाईक’ या प्रकारातील ग्रॅव्हल, एरो आणि क्लायम्बिंग या सायकलींची खरेदी केली जाते.
’२५ हजार रुपयांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत त्यांची किंमत असते. या दोन्ही प्रकारच्या सायकलींचा मध्य गाठणारी म्हणजेच हायब्रीड हा सायकल प्रकार सध्या लोकप्रिय होत आहे.