सत्ता आल्यानंतर आरेला जंगल घोषित करणारच अशी घोषणा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. एवढंच नाही तर आरे जंगल बचाव म्हणणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे का दाखल का करण्यात आले आहेत? असाही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आज दुपारीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा दिला. त्यापाठोपाठ आता आदित्य ठाकरेही आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं आहे. आंदोलन झालं ते शांततेच्या मार्गानं झालं. मग पोलिसांनी आंदोलकांना अटक का केली? असंही आदित्य ठाकरे यांनी विचारलं आहे. जर शांततेने आंदोलन करणाऱ्यांना आपण तुरुंगात टाकणार असू तर स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणाऱ्या सरकारला लाज वाटली पाहिजे असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

एवढंच नाही तर, “निवडणूक तोंडावर असताना पोलिसांना अतिरिक्त ड्युटी का लावली गेली आहे? तीन हजार पोलीस आरे परिसरात तैनात करण्यात आले आहेत. त्यांना हा अतिरिक्त ताण नाही का? असाही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर जे तरुण शांतपणे आंदोलन करत आहेत त्यांच्यावर केसेस टाकल्या जात आहेत. 21 वर्षांच्या मुलावर केस टाकली कशासाठी तर झाड वाचवण्यासाठी तो उभा आहे म्हणून, या कृतीला काहीही अर्थ नाही” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएन मध्ये जातात किंवा देशाचं शिष्टमंडळ यूएनला जातं तेव्हा आपण आकडे सांगतो की आम्ही एवढी झाडं लावली, तेवढी झाडं लावली. 13 कोटी झाडांचे होर्डिंग्ज आपण कशासाठी लावले आहेत? या सगळ्या भूमिकेला काय अर्थ आहे?” असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

कोर्टाने जो निकाल दिला तो दिला. तुमचा त्यात विजय झाला, असं असतानाच तुम्ही रात्रीतून लपूनछपून वृक्षतोड का करत आहात? MMRCA च्या अधिकाऱ्यांनी हे ऐकून घ्यावं की शिवसेना गप्प बसणार नाही. कोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी सुरु राहणार. अधिकारी स्वतःला राजकीय पक्ष समजत आहेत का? कोर्टात केस जिंकल्यावर जी गोष्ट अभिमानाने करायला हवी ती लपून का करत आहात? म्हणजे या अधिकाऱ्यांमध्ये लाजही उरलेली नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच असे भूखंड चोर नको आम्हाला नको आम्हाला आमच्या सत्तेत. शिवसेना सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल घोषित करणारच असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.